वृत्तसंस्था/ मुंबई
जानेवारी महिन्यात लंकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर मालिका खेळण्यासाठी येणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसेच सलामीचा फलंदाज के. एल. राहुल यांना ही मालिका दुखापत व अन्य समस्येमुळे हुकण्याची शक्यता आहे.
लंका आणि भारत यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. या दोन्ही मालिका 3 ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. बांगलादेश विरुद्धच्या दुसऱया सामन्यात खेळताना रोहितला ही दुखापत झाली होती. त्याचप्रमाणे भारताचा सलामीचा फलंदाज के. एल. राहुल याचा विवाह असल्याने तो या मालिकेसाठी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. 2022 चा क्रिकेट हंगाम रोहित शर्माला फारसा समाधानकारक ठरला नाही. या कालावधीत त्याने दोन कसोटीमध्ये केवळ 90 धावा जमविल्या. तसेच त्याने 8 वनडे सामन्यात 41.50 धावांच्या सरासरीने 249 धावा केल्या असून त्यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितने या कालावधीत 29 टी-20 सामन्यात 656 धावा जमविल्या असून त्यामध्ये 3 अर्धशतकांचा सहभाग आहे. चालू वर्षीच्या संपूर्ण क्रिकेट हंगामात रोहितने क्रिकेटच्या विविध प्रकारात 995 धावा जमविल्या असून त्याला 1000 धावांचा टप्पा गाठता आला नाही. भारतीय संघातील सलामीचा फलंदाज के. एल. राहुल यालाही धावा जमविण्यासाठी चालू वर्षीच्या कालावधीत झगडावे लागले. या कालावधीत त्याने 4 कासोटीत केवळ 137 धावा तर 10 वनडे सामन्यात 251 आणि 16 टी-20 सामन्यात 434 धावा जमविल्या आहेत. राहुलने क्रिकेटच्या विविध प्रकारात 2022 च्या हंगामात एकूण 822 धावा केल्या असून त्यामध्ये 9 अर्धशतकांचा समावेश आहे.