वृत्तसंस्था/ पॅरिस
रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील पॅरिस मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत 19 वषीय युवा टेनिसपटू होल्गेर रुनेने एकेरीचे जेतेपद मिळविताना अनुभवी आणि माजी टॉप सीडेड सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला. रुनेचे एटीपी मास्टर्स स्पर्धेतील हे पहिलेच विजेतेपद आहे.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात रुनेने जोकोविचचा 3-6, 6-3, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव केला. या लढतीत जोकोविचने पहिला सेट जिंकून रुनेवर आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर पुढील दोन सेट्समध्ये रुनेने आपल्या अचूक आणि वेगवान सर्व्हिसवर तसेच बेसलाईन खेळावर अधिक भर देत जोकोविचचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेमध्ये रुनेने हुरकेझ, रुबलेव्ह, ऍल्पॅरेझ आणि ऍलीसिमे यांचा पराभव करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. जोकोविच आणि रुने यांच्यातील हा अंतिम सामना 2 तास 33 मिनिटे चालला होता. एटीपीच्या ताज्या मानांकनात आता रुने दहाव्या स्थानावर झेप घेत आहे.