सामनावीर रशिद खान, नूर अहमद यांचा भेदक मारा, हार्दिकची फटकेबाजी, 14 गुणासह गुजरातची आघाडी भक्कम
वृत्तसंस्था/ जयपूर
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या 48 व्या सामन्यात अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 9 गड्यांनी एकतर्फी पराभव केला. या विजयामुळे गुजरात टायटन्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 14 गुणासह आपले अग्रस्थान अधिक मजबूत केले. मात्र, राजस्थान रॉयल्स 10 गुणासह चौथ्या स्थानावर आहे.
विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सला राजस्थानकडून फार मोठे आव्हान मिळाले नसले तरी गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी खेळपट्टीचा स्वभाव बघत सावध फलंदाजी केली. साहा आणि गिल या सलामीच्या जोडीने 58 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली. डावातील 10 व्या षटकात चहलने गिलला यष्टीरक्षक सॅमसनकरवी यष्टीचित केले. गिलने 35 चेंडूत 6 चौकारासह 36 धावा जमवल्या. गुजरात टायटन्सने पॉवर प्लेच्या 6 षटकात 49 धावा जमविल्या होत्या. साहा आणि गिल यांनी अर्धशतकी भागीदारी 38 चेंडूत नोंदवली.
गिल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कर्णधार हार्दिक पंड्याने आक्रमक फटकेबाजीला प्रारंभ केला. त्याने केवळ 15 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 39 धावा जमवताना साहासमवेत दुसऱ्या गड्यासाठी 25 चेंडूत अभेद्य 48 धावांची भागीदारी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. साहाने 34 चेंडूत 5 चौकारासह नाबाद 41 धावा झळकवल्या. गुजरातला अवांतराच्या रुपात 3 धावा मिळाल्या. गुजरातच्या डावात 3 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले. राजस्थानतर्फे चहलने 22 धावात एक गडी बाद केला.
रशिद खानचा भेदक मारा
तत्पूर्वी, भेदक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला 17.5 षटकात 118 धावात गुंडाळले. फिरकीस अनुकूल ठरलेल्या खेळपट्टीवर गुजरात टायटन्सच्या रशिद खान आणि नूर अहमद या अफगाणच्या गोलंदाजांनी 5 गडी बाद केले. राजस्थान संघातर्फे कर्णधार संजू सॅमसनने एकाकी लढत देत 30 धावा जमविल्या.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. जैस्वाल आणि बटलर या सलामीच्या जोडीने 10 चेंडूत 11 धावा जमविल्यानंतर हार्दिक पंड्याने बटलरला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या. जैस्वाल आणि सॅमसन या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 36 धावांची भर घातली. चोरटी धाव घेण्याच्या नादात जैस्वाल धावचीत झाला. त्याने 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 धावा जमविल्या. लिटलने संजू सॅमसनला झेलबाद केले. त्याने 20 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 30 धावा जमविल्या. गुजरात संघातील फिरकी गोलंदाज रशिद खानने रवीचंद्रन अश्विनचा 2 धावावर त्रिफळा उडविला. त्यानंतर रशिद खानने राजस्थानच्या परागला 4 धावावर पायचीत केले. नूर अहमदने देवदत्त पडीक्कलला त्रिफळाचीत केले. त्याने 12 चेंडूत 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. रशिद खानसमोर हेटमेयर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात पायचीत झाला. त्याने 7 धावा जमविल्या. नूर अहमदने ध्रुव जुरेलला पायचीत केले. त्याने 1 चौकारासह 9 धावा केल्या. बोल्टने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. शमीने त्याचा त्रिफळा उडविला. अॅडम झाम्पा 7 धावावर धावचीत झाला तर संदीप शर्मा 2 धावावर नाबाद राहिला. 17.5 षटकात राजस्थानचा डाव 118 धावात आटोपला. त्यांच्या डावात 3 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. राजस्थानला अवांतराच्या रुपात 8 धावा मिळाल्या. गुजरात टायटन्सतर्फे रशिद खानने 14 धावात 3, नूर अहमदने 25 धावात 2 तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या व लिटल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. राजस्थानचे 2 फलंदाज धावचीत झाले.
संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स 17.5 षटकात सर्व बाद 118 (सॅमसन 20 चेंडूत 30 धावा, पडीक्कल 12 चेंडूत 12 धावा, जैस्वाल 11 चेंडूत 14 धावा, बोल्ट 11 चेंडूत 15 धावा, अवांतर 8, रशिद खान 3-14, नूर अहमद 2-25, शमी 1-27, हार्दिक पंड्या 1-22, लिटल 1-24),
गुजरात टायटन्स 13.5 षटकात 1 बाद 119 (साहा 34 चेंडूत नाबाद 41, शुभमन गिल 35 चेंडूत 36, हार्दिक पंड्या 15 चेंडूत नाबाद 39, अवांतर 3, यजुवेंद्र चहल 1-22).