वृत्तसंस्था/ गुडालजेरा
येथे सुरू असलेल्या गुडालजेरा खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीची चौथी मानांकित मारिया सॅकेरी तसेच बेलारुसची 33 वर्षीय व्हिक्टोरिया अझारेंका यांनी एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे. इटलीच्या सॅकेरीने वर्षअखेरीस होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील अंतिम स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सॅकेरीने व्हेरोनिका कुड्रेमेटोव्हाचा 6-1, 5-7, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने आपल्याच देशाच्या स्लोनी स्टिफेन्सवर 6-2, 6-2 अशी मात करत उपांत्यफेरी गाठली. अन्य एका सामन्यात बेलारुसच्या अनुभवी अझारेंकाने अमेरिकेच्या नवोदित 18 वषीय कोको गॉफचा 7-6 (7-2), 4-6, 6-3 असा पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत अझारेंकाला विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. या सामन्यामध्ये अझारेंकाने दहा बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. वर्षअखेरीस होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील फायनल्स (अंतिम) स्पर्धेसाठी एकूण आठ खेळाडूंची निवड केली जाते. यामध्ये आता सॅकेरीने स्थान मिळविले आहे. आता या स्पर्धेत पोलंडची टॉप सीडेड इगा स्वायटेक, जेबॉर, पेगुला, कोको गॉफ, कॅरोलिनी गार्सिया, सॅबेलिनेका, कॅसेटकिना आणि सॅकेरी यांचा समावेश राहील.