वृत्तसस्था/ नवी दिल्ली
दुबईमध्ये 14 ते 19 फेब्रुवारी दरम्यान होणाऱया आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी घेण्यात येणाऱया निवड चाचणीत सायना नेहवालचे नाव घोषित करण्यात आले आहे. ही निवड चाचणी स्पर्धा जानेवारी महिन्यात होणार आहे.
25 डिसेंबर रोजी झालेल्या अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या वरिष्ठ निवड समितीच्या बैठकीत आशियाई मिश्र सांघिक स्पर्धेकरिता निवड चाचणी स्पर्धा घेण्याचा निर्णय निश्चित केला होता. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मानांकनाच्या आधारित निवड समितीने एकेरीमध्ये लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय, पी. व्ही. सिंधू तसेच पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांना थेट प्रवेश घेण्याचे निश्चित केले आहे. या आगामी स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱया 14 जणांच्या संघातील उर्वरित बॅडमिंटनपटूंची निवड दिल्लीत 2-3 जानेवारीला होणाऱया निवड चाचणी स्पर्धेतून केली जाईल, असे फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताची माजी टॉप सिडेड सायना नेहवालला निवड चाचणी स्पर्धेतून वगळण्यात आले होते.