हिंडलगा हुतात्मा स्मारकावर उपस्थित राहण्याचे आवाहन : तालुका म. ए. समितीला बळकटी देण्याचा निर्णय
बेळगाव : सीमाभागात लागू करण्यात आलेल्या कन्नड सक्तीविरोधात 1 जून 1986 ला आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात नऊ सीमाबांधवांना हौतात्म्य पत्करावे लागले. कन्नड सक्तीचा वरवंटा अजूनही सुरूच असून हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शनिवार दि. 1 जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे सीमावासीयांतर्फे श्रद्धांजली वाहण्याचा ठराव रविवारी आयोजित तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. सर्व सीमाबांधवांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीदरम्यान तालुका म. ए. समितीच्या संघटनात्मक बळकटीसाठी चर्चा करण्यात आली. 4 जूननंतर तालुका म. ए. समितीची व्यापक बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर संघटनेचा विस्तार करण्यासोबतच प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. प्रत्येक गावात जाऊन तेथील सदस्यांना तालुका म. ए. समितीमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे. संघटनेत आलेली मरगळ दूर करून बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हिंडलगा येथे हुतात्म्यांना अभिवादन करून मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सकाळी 8.30 वाजता मोठ्या संख्येने सीमाबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. त्याचबरोबर इतर विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, एम. जी. पाटील, मनोज पावशे, रामचंद्र मोदगेकर, मनोहर संताजी, एल. एस. होनगेकर, आर. के. पाटील, नारायण कालकुंद्रीकर, डी. बी. पाटील यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.