कासेगाव/वार्ताहर
वाळवा तालुक्यातील कासेगांव पोलीस ठाणे हददीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश जयवंत चव्हाण (वय २५), रा. वाटेगांव ता. वाळवा व जागरनाथ बाजीराव पाटील (वय ४२), रा. नेर्ले या दोघा सराईतांना अनुक्रमे ०१ वर्षे व ६ महिने या कालावधीकरीता सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्हयातून तडीपार करण्यात आलेले आहे. याबाबतचे आदेश मा. उपविभागीय दंडाधिकारी वाळवा इस्लामपूर यांनी दिले आहेत.
सुरेश जयवंत चव्हाण हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कासेगांव पोलीस ठाणेत चोरी करणे, दरोडा घालणेकरीता एकत्र जमणे, दरोडा घालण्याची पूर्व तयारी करणे, घातक शस्त्र बाळगणे, यासारखे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. तर जागरनाथ बाजीराव पाटील याचे विरुद्ध गर्दी मारामारी, घातक हत्यारांनी दुखापत पोहचवणे, शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे फौजदारी पात्र धाकदपटशहा असे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक सांगली दिक्षित गेडाम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली कासेगांव पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश मते, पोलीस हवालदार महेश रामकुष्ण गायकवाड यांनी सुरेश जयवंत चव्हाण व जागरनाथ बाजीराव पाटील यांचे विरुध्द हददपार प्रस्ताव तयार करून मा. पोलीस अधीक्षकांच्या मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी वाळवा विभाग इस्लामपूर यांचे कार्यालयाकडे सादर केला. त्यानूसार उपविभागीय दंडाधिकारी वाळवा इस्लामपूर यांनी या दोघांवर तडीपारीचा आदेश पारीत केला आहे.