सात गावातून एक गाव एक गणपती : तीन गावातून डॉल्बीमुक्त गणपती
विटा प्रतिनिधी
शहरासह खानापूर तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सवात उत्साहाचे स्वरूप पहायला मिळाले. यावर्षी खानापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. मात्र गणेशोत्सवाच्या उत्साहात कमी नाही. भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ‘विट्याचा राजा’ मंडळात देखिल मुर्तीची प्रतिष्ठापना भक्तीपूर्ण वातावरणात करण्यात आली. यावर्षी चार फुट उंच मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. त्यामुळे देखाव्याची भव्यता आणखी वाढली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणरायाच्या स्वागतासाठी शहरात मोठ्या प -माणात फटाक्यांची आतिषबाजी पहायला मिळत होती.
यावर्षी गावोगावी सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात होत आहे. तरूण मुले, विद्यार्थी आणि नागरीक मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पांचे स्वागत करीत आहेत. त्याचबरोबर घरोघरी देखिल उत्साहात गणरायाचे आगमन झाले आहे. तालुक्यातील सात गावांत एक गाव एक गणपती उत्सव राबवण्यात येत आहे. त्यामुळे या गावातून गावस्वरूपी उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा होत आहे.
सात गावात एक गाव एक गणपती
तालुक्यात एकुण २०९ गणेशोत्सव मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. एकुण ६३ गावापैकी ७ ठिकाणी एक गाव एक गणपती मोहीम यशस्वी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने भडकेवाडी, कळंबी, करंजे, मोही, वेताळनागर, सुलतानगादे, देवनगर या गावांचा समावेश आहे. तर विटा शहरात एकुण २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठ देखिल सजली होती. गौरी-गणपती सणसाठी आरास साहित्याचे मोठे स्टॉल शहरात लागले आहेत..
सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपारिक वाद्याच्या निनादात गणरायाचा जयघोष करीत गणपतीचे स्वागत केले. ठिकठिकाणी गणपती आगमनाच्या मिरवणूका निघाल्या होत्या. त्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शहरात दिवसभर फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती.
गेल्या काही वर्षांपासून विटा शहरासह परिसरातील जिल्ह्यातील भाविकांचे श्र -द्धास्थान असणाऱ्या विट्याच्या राजाची स्थापना भक्तीपूर्ण वातावरणात करण्यात आली. मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाची प्रतिकृती विट्यात स्थापन करण्यात येते. मुंबईस्थित संतोष कांबळी हे कांबळी आर्टस्चे लालबागचा राजाची मुर्ती तयार करणारे मुर्तीकार विट्याच्या राजाची मुर्ती करीत असतात. हीच मुर्ती विट्याचा राजा म्हणून स्थापन करण्यात येते. अत्यंत देखणी आणि आकर्षक मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण गणेशोत्सवात भाविकांची रांग लागलेली असते. यावर्षी चार फुट उंच गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. त्यासाठी देखाव्याची भव्यता देखिल वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विट्याच्या राजाची मुर्ती आणि देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.
तालुक्यात तीन गावातून डॉल्बीमुक्त गणपती – संतोष डोके
खानापूर तालुक्यातील आळसंद लेंगरेसह अन्य गावातून डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी पुढाकार घेऊन आवाहन केले होते. मोठ्या गावातून मिरवणूका जास्त काळ चालत असतात. त्यामुळे डॉल्बीतून होणारे ध्वनीप्रदुषण घातक आहे. त्यासाठी पोलिस निरीक्षक डोके यांनी सर्वच गावातील मंडळांना डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे. या निमीत्ताने डॉल्बीमुक्तीची सुरुवात झाली हे महत्वाचे.