आजी- माजी सैनिक संघटना आक्रमक, अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार
सावळज/ वार्ताहर
सावळज येथे “मेरी मिट्टी, मेरा देश” अभियानांतर्गत शासनातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमात शहीद जवान शिला फलक लावलेल्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. जिन्या खाली अडगळीत शिला फलक लावुन अवहेलना केल्याचा आरोप करीत आजी-माजी सैनिक संघटना, वीरमाता, वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबीयांनी फलक अनावरण कार्यक्रमावर बहिष्कार टाकत संताप व्यक्त केला आहे. सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहिदांचा सन्मान करता येत नसेल तर अवहेलना ही करू नये असा इशारा संघटनेने पत्रकातून दिला आहे.
सावळज येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून शहीद जवानाचा शीला फलक जिन्या खाली लावण्यात आला आहे. ती जागा योग्य नसुन अडगळीची जागा असल्याचा आजी माजी सैनिक संघटनेने केला आहे. तसेच जिन्याखाली अडगळीच्या जागेत धुम्रपान करणाऱ्या लोकांच्याकडुन अस्वच्छता पसरवली जाते. पायऱ्याखाली शिलाफलक लावण्यात आल्याने पायऱ्यावरून रोज शेकडो लोक बँकेच्या कामासाठी चप्पल व बूट घालून ये-जा करीत असतात. त्यामुळे ही शहिदांची अवहेलना ठरते आहे. असे आरोप पत्रकाद्वारे करण्यात आले असून आपण कुटुंबातील थोर व्यक्तींची म्हणजेच आई-वडीलांची समाधी किंवा स्मृतिफलक पायऱ्यांच्या खाली केला असता का? असा संतप्त सवाल करीत ग्रामपंचायत प्रशासन मनमानी कारभार करीत शासनाच्या आदेशाने पालन न करता शिलाफलकाची अवहेलना केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच या अडगळीच्या ठिकाणी शिला फलक लावु नये असे शहीद जवानांच्या कुटुंबियांनी विनंती अर्ज करून ही त्यांची विनंती फेटाळून या ठिकाणीच अनावरण करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या शिलाफलक अनावरण कार्यक्रमावर आजी- माजी सैनिक संघटना, वीरमाता, वीरपत्नी व कुटुंबीयांनी बहिष्कार टाकला.
ज्या शहिदांनी आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी देशाच्या सीमेचे संरक्षण करीत असताना हसत सर्वोच्च बलिदान केले त्यांच्या शिलाफलकाची अवहेलना करू नये तसेच सन्मान देऊ शकत नसाल तर अवहेलना तरी करू नका अशी विनंती संघटनेतर्फे तसेच शहीद परिवारातर्फे करण्यात आली आहे.
शासनाच्या नियमानुसार शिलाफलक – सरपंच
दरम्यान शासनाच्या आदेशानुसारच ग्रामपंचायत परिसरात शिलाफलकाचे अनावरण केले असुन संबंधीत आजी-माजी सैनिक संघटना इतर ठिकाणी ते करु शकतात. अनावरण झालेल्या शिलाफलकाचे संरक्षक कठडा, सावली व सुशोभीकरण करण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया सरपंच स्वाती पोळ यांनी दिली.