एका रात्रीत तीन दुकाने, एक बंगला फोडून दहा तोळे सोने लंपास, ५५ हजार रुपयांची रोकड, एक दुचाकी चोरी
शिराळा/प्रतिनिधी
शिराळा शहरातील बसस्थानक परिसरात एका रात्रीत तीन दुकानासह एक बंगला फोडून दहा तोळे सोने लंपास केले. तर ग्राहक सेवा केंद्राचे शटर उचकटून ५५ हजार रुपयांची रोकड चोरी करून एक मोटरसायकल घेऊन चोरटे पसार झाले आहेत. यावेळी चोरट्यांनी तीन दुचाकी गाड्या चोरुन नेल्या होत्या. त्या पैकी दोन गाड्या शेतात टाकून चोरट्यांनी पलायन केले आहे. सदर चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वाडेकर, पोलीस नाईक विनोद जाधव, अमोल साठे, नितीन यादव, महेश साळुंखे, कालिदास गावडे, बाबूराव पाटील, राजेंद्र माने यांनी भेट देऊन पाहणी केली. तर श्वानपथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. श्वानपथक घटना स्थळावरुन सुमारे एक ते दीड किलोमीटरवर कापरी नाक्यावरील बायपास रोड पर्यंत गेले व तिथे जाऊन घुटमळले. याबाबत वनिता सुरेश पोवार (वय ४९) रा. शिराळा यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शिराळा येथील बसस्थानकाजवळच स्टेट बॅंकेच्या शेजारी सदर चोरट्यांनी रात्रीच्या १.३० वाजण्याच्या सुमारास हर्षद मुल्ला (रा.शिराळा) यांच्या इंडिया ऑटो मोबाईल या स्पेअर पार्टच्या दुकानाचे शटर उचकटले परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. नंतर जवळच असलेल्या सुरज रामराम पाटील (रा. अंत्री बु!) यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राचे शटर उचकटून त्यामधील ५५ हजार रुपयांची रोकड चोरली व शेजारील अरविंद शेणेकर (रा. बिऊर) यांच्या अरु काॅम्प्युटर व झेरॉक्स सेंटरचे शटर उचकटून त्यामध्ये ही प्रवेश केला परंतु तिथे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
तसेच स्टेट बॅंकेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या नलवडे काॅलनीमधील वनिता परेश पोवार या गावी गेल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात प्रवेश करुन बेडरूम मधील तिजोरीचे दार उघडले व लाॅकर तोडून त्यामधील पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण, तीन तोळ्याच्या बांगडया व दोन तोळ्याची कर्णफुले व वेल असे दहा तोळे सोने लंपास केले. यावेळी घरातील बेडरूममधील कपाट उघडून सर्व साहित्य विस्कटून टाकल्याचे पहावयास मिळाले.
तसेच चोरट्यांनी याच भागातील तीन दुचाकी गाड्याही चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु यातील दोन गाड्या चोरट्यांनी सुनील कांबळे (एम एच १२ डब्लू ७२९३ व भीमराव ढोले यांची (टी एन ०९ इजे ८९३२) गाडी शेतातच टाकून पळ काढला. तर अमन इंम्तियाज मुल्ला यांची एक गाडी हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक ( एम एच १० डीके ५५२०) चोरून घेऊन गेले आहेत. या प्रकरणात सदर चोरट्यांनी दहा तोळे सोने, पस्तीस हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी व रोख ५५ हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वाडेकर करत आहेत.