सांगली प्रतिनिधी
तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातील गावांना टेंभू योजनेतून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला दोनच दिवसांपूर्वी ‘नौटंकी’ असे संबोधणाऱ्या भाजप खासदार संजयकाका पाटील यांना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी “दे धक्का” करत पाठिंबा दर्शवला आहे.
जाहीर केल्याप्रमाणे आमदार सुमनताई पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कचेरी समोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. त्यांच्यासोबत रोहित पाटील यांचाही सहभाग होता. मात्र आता या आंदोलनाची चर्चा वेगळ्याच कारणाने सुरू झाली आहे.
खासदार संजय काका पाटील यांनी जोराची टीका करत या योजनेला मान्यता मिळणारच असल्याने पुत्राचे भवितव्य अंधकारमय बनल्याने काळजीपोटी मातेचे उपोषण असल्याची आणि त्याची नौटंकी अशी संभावना करत तुमचे उपोषण म्हणजे 45 वर्षाच्या नाकर्तेपणाची कबुली असल्याची टीका केली होती.
त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या आंदोलनाला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. आपण यात राजकारण आणत नसून पक्षीय जोडे बाजूला ठेवून या प्रश्नाकडे पहिले पाहिजे. टेंभू योजनेचे जनक संपतराव अण्णा देशमुख हे आहेत आणि ही योजना ही त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे सुमंतांनी घेतलेल्या भूमिकेला लोकांच्या हितासाठी आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. संजय काका आणि पृथ्वीराज बाबा यांचे राजकीय सख्य किती आहे ते संपूर्ण जिल्हा जाणतो. त्यामुळेच बाबांनी काकांना दिलेला हा दे धक्का सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. काका आणि बाबा यांना भाजपमध्ये येत्या लोकसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून ओळखले जाते आणि यांचा पक्ष आपल्याला संजय काकांना ऐवजी उमेदवारी देईल अशी अपेक्षा बाळगून पृथ्वीराज देशमुख यांनी आपले पत्ते पिसण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भूमिका भाजपमध्येही खळबळ उडवणारी आहे.