पारदर्शीच्या नावाखाली संबंधित कंपनीचा प्रकार
सांगली प्रतिनिधी
जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी पाच ते 25 ऑगस्ट दरम्यान पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत संपून चार दिवस झाले तरी प्रशासनाकडे एकूण अर्जांची माहिती नाही. संबंधित कंपनीने पारदर्शी भरतीच्या नावाखाली भरती प्रक्रियेमध्ये एकप्रकारे गोंधळच सुरू केल्याने परीक्षार्थीकडून संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कोरानापासून भरती प्रक्रिया रखडली होती. हजारो पदे रिक्त होती. यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण पडत होता, कर्मचारी संघटनांकडून रिक्त पदे भरण्याची वारंवार मागणी केली जात होती. या पार्श्वभूमिवर शासनाकडून रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषदेतही सुमारे 754 पदाची सरळ सेवेव्दारे भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, सेवक, परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ट लिपिक, कनिष्ठ अभियंतासह 17 संवर्गातील पदांचा समावेश आहे. परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीची निवड करण्यात आली आहे. भरतीसाठी पाच ते 25 ऑगस्ट या कालावधित ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत होती.
जिह्यातील मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, अर्ज करण्याची अंतिम मुदत होऊन चार दिवस झाले तरी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे किती अर्ज दाखल झाले याची आकडेवारीच उपलब्ध नाही. याबाबत सामान्य प्रशासन विभागाशी संपर्क साधला असता संबंधित कंपनीने अद्याप आकडेवारी दिली नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, संपूर्ण भरती प्रक्रिया संबंधित कंपनीकडून राबविली जाणार असल्याने प्रशासनाकडे याची कोणतीही माहिती दिली जात नाही. भरती कधी होणार, याबाबतचे वेळापत्रकही अद्याप जाहीर केले नाही. तशी माहिती जि. प. कडे नाही. पारदर्शी भरतीच्या नावाखाली गोंधळ सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गेल्यावर्षीही शासनाने कंपनीमार्फतच भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र एजंटामार्फत पेपर फुटीचा प्रकार बाहेर आल्यानंतर ही भरती रद्द करण्यात आली होती. या भरतीमध्येही अशीच शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच कंपीनीने भरतीची संपूर्ण प्रक्रिया स्वत:कडे ठेवली असल्याने उलट-सुटल चर्चेला ऊत आला आहे.
या पदासाठी भरती सुरू
आरोग्य पर्यवेक्षक चार जागा, कंत्राटी ग्रामसेवक 52, आरोग्य सेवक (पु.) हंगामी फवारणीमधून 168, आरोग्य सेवक (पु.) 17, आरोग्य सेवक (म) 366, औषध निर्माण अधिकारी 23, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) 34, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, बांधकाम) 26, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम, लघुपाटबंधारे) 23, कानिष्ठ आरेखक एक, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका 9, पशूधन पर्यवेक्षक 22, विस्तार अधिकारी एक, विस्तार अधिकारी एक, विस्तार अधिकारी दोन अशा 17 संवर्गाची 754 पदाची भरती होणार आहे.