वार्ताहर /म्हार्दोळ
गणेश चतुर्थी सणात कलात्मक माटोळी सजविण्याच्या कलेत आपले वेगळेपण जपणाऱया गावठणवाडा-प्रियोळ येथील दत्ता नाईक यांनी यंदाही हे वैशिष्टय़ जपले आहे. साधारण 350 निरनिराळी रानफळे, वनौषधी व बागायती फळांचा वापर करुन यंदा त्यांनी संत गोरा कुंभार यांची प्रतिकृती साकारली आहे. त्यांच्या घरातील ही माटोळी चतुर्थी काळातील आकर्षण ठरली आहे.
दत्ता नाईक हे खूप पूर्वीपासून आपल्या गणपतीसमोर वैविद्यपूर्ण अशी माटोळी सजवित आले आहेत. मात्र सन 2014 पासून त्यांनी राज्यस्तरीय माटोळी स्पर्धेत सहभाग दर्शविला व त्यात वैविद्याबरोबरच कलात्मकता आणली. श्रावण महिना सुरु होताच गोव्याच्या विविध भागातील रानावनात माटोळीसाठी लागणाऱया साहित्याचे निरीक्षण करण्यास त्यांची भ्रंमती सुरु होते. चतुर्थी जवळ येताच हे साहित्य गोळा केले जाते. दत्ता नाईक व त्यांच्या सहकाऱयांनी सत्तरी, फोंडा, तिसवाडी, सांगे, काणकोण या तालुक्यांसह चोर्ला व अनमोड घाटातील वन्य परिसरात भटकंती केली आहे. यंदा त्यांच्या माटोळीत कांगला, माट्टा, कात्रे या पारंपरिक फळांसह पेराघोसाळे, देवकापूस, अमृतवेल, गजगा, गोरखचिंच, पाच प्रकारचे गुंजी, बुद्धनारळ, तंबाखू फुल व फळ, सांगतीफळ वेतफळ, चिलगोण या काही दुर्मिळ वनस्पतींचा समावेश आहे. याशिवाय भाताची कणसे, गहू, ज्वारी, बाजरी या धान्याचाही वापर केलेला आहे. कलात्मक माटोळी सजविताना त्यांनी संत गोरा कुंभार यांची प्रतिकृती साकारली आहे. यापूर्वी त्यांनी माटोळीतून साकारलेला शिवशंकर, भगवान गौतम बुद्ध व भातापासून तयार केलेल्या गणपतीच्या प्रतिकृतीला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच तीनवेळा उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
माटोळी सजविण्याच्या या कामात त्यांना त्यांचे काका कृष्णनाथ नाईक, भाऊ संजय तसेच कुटुंब सदस्यांपैकी साईज, शुभंक, पुष्पज, पराग, विराज, विनय यांच्यासह आकाश गावडे, अनिकेत देविदास, मुलराज गावडे, तनय गुरव आदींचे सहकार्य लाभत आहे.