वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान पुन्हा आजारी पडले आहेत. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारी रात्री उशिरा सप नेत्याला रुग्णालयात हलविण्यात आले. यापूर्वी तुरुंगातून बाहेर पडल्यावर विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापूर्वी प्रकृती बिघडल्याचे सांगत स्वतःच्या गावी म्हणजेच रामपूरमध्ये धाव घेतली होती.
सीतापूर तुरुंगात असतानाही आझम यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर शनिवारी छातीत वेदना होऊ लागताच आझम यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे एक पथक आझम यांच्या प्रकृतीवर सातत्याने नजर ठेवून आहे. 27 महिने तुरुंगात काढल्यावर अलिकडेच आझम यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. तुरुंगात असताना प्रकृती बिघडल्याचे त्यांनी म्हटले होते.