लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त 6.53 पासून 8.18 पर्यंत
प्रतिनिधी/ सातारा
दिवाळीचे पहिले अभ्यंग स्नान सोमवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी दिवाळीची तयारी सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील बाजारपेठेत दिवाळीच्या नरकचतुदर्शीच्या पूर्वसंध्येला गर्दीचा महापूर उसळला होता. कोटय़ावधी रुपयांची उलाढाल झाली असून दरम्यान पहिले अभ्यंगस्नान करण्याच्या तयारीत सातारकर आहेत. लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त सायंकाळी 6.53 ते 8.18 वाजेपर्यंत आहे.
दिन दिन दिवाळी म्हणत दिवाळीचा सण आला. कोरोनाचे दोन वर्ष गेल्यानंतर यावर्षी पुन्हा त्याच उत्साहात त्याच दिमाखात दिवाळीचा सण साजरा होत आहे. पहिले अभ्यंगस्नान सोमवारी होत आहे. नरक चतुदर्शीच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्यासाठी बाळगोपाळांबरोबर घराघरातील प्रत्येकांची लगबग सुरु असते. साताऱयात दिवाळी पहाटे कार्यक्रमांचेही ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत तुफान गर्दी झाली होती. कापडदुकानांबरोबरच किरकोळ होलसेल किराणामालाच्या दुकानात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. सोन्याचांदीच्या वस्तू खरेदीसाठीही सराफ पेढीवर गर्दी दिसत होती. दरम्यान, फटाक्यांच्या स्टॉलवर फटाके खरेदीकरता सातारकर दिसत होते. नरकचतुदर्शीच्या सकाळी लवकर उठून साताऱयात काही ठिकाणी गीतांच्या मैफिलींचे दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त
सोमवारी सायंकाळी अमावस्या 5 वाजून 27 मिनिटांनी सुरु होत आहे. ती 25 ऑक्टोबर 4 वाजून 18 मिनिटांनी समाप्त होणार आहे. लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त हा सायंकाळी 6.53 ते रात्री 8.18 वाजेपर्यत पंचागांमध्ये दाखवण्यात आला आहे. या मुहुर्तावर लक्ष्मीपूजन करण्यासाठी पुरोहितांना ऍडव्हॉन्स बुकींग करण्यात आले आहे.