स्विस ओपन बॅडमिंटन ः पीव्ही सिंधू, के.श्रीकांत, एचएस प्रणॉय, मंजुनाथ स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ बॅसेल, स्वित्झर्लंड
ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूचे बीडब्ल्यूएफ टूर सुपर 300 स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान दुसऱया फेरीतच समाप्त झाल्याने जेतेपद स्वतःकडे राखण्यात तिला अपयश आले. इंडोनेशियाच्या बिगर मानांकित पुत्री कुसुमा वारदानीने तिला तीन गेम्सच्या रोमांचक लढतीत पराभवाचा धक्का दिला. याशिवाय एचएस प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत, मिथुन मंजुनाथ यांचे आव्हानही संपुष्टात आले. पुरुष दुहेरीत मात्र सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठत भारताचे आव्हान राखले आहे.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱया सिंधूला येथे चौथे मानांकन मिळाले होते. वारदानीने तिला 15-21, 21-12, 18-21 असे चकित करीत आगेकूच केली. या दोघींमध्ये झालेली ही पहिलीच लढत होती. पुरुष दुहेरीत मात्र भारताच्या सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी भारताचे आव्हान जिवंत ठेवताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. या दुसऱया मानांकित जोडीने चुरशीच्या लढतीत तैवानच्या फँग चिह ली व फँग जेन ली यांच्यावर 12-21, 21-17, 28-26 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱया भारतीय जोडीची पुढील लढत डेन्मार्कच्या जेपे बे व लासे मोलहिदे यांच्याशी होईल.
त्याआधी गुरुवारी जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱया व येथे पाचवे मानांकन मिळालेल्या एचएस प्रणॉयचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. फ्रान्सच्या बिगरमानांकित ख्रिस्तोफ पोपोव्हने त्याला 21-8, 21-8 असे पराभूत केले. पोपोव्ह जागतिक क्रमवारीत 40 व्या स्थानावर आहे. प्रणॉयच्या आधी किदाम्बी श्रीकांतही स्पर्धेबाहेर पडला. हाँगकाँगच्या चेउक यियू ली याने त्याला चुरशीच्या लढतीत 22-20 21-17 असे हरविले. राष्ट्रीय विजेता मिथुन मंजुनाथलाही पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱया फेरीत त्याला चिनी तैपेईच्या चिया हाओ ली याने 21-9, 21-10 असे हरविले.