वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
भारतीय महिला हॉकी संघाने मलेशियाचा 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडवित आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळविला.
सिंगापूरविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात 13-0 असा एकतर्फी विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पहिल्या सत्रातच चार गोल नोंदवले. मोनिकाने सातव्या मिनिटाला पहिला गोल नोंदवल्यानंतर उपकर्णधार दीप ग्रेस एक्काने 8 व्या, नवनीत कौरने 11 व्या, वैष्णवी विठ्ठल फाळकेने 15 व्या, संगीता कुमारीने 24 व्या, लालरेमसियामनी 50 व्या मिनिटाला उर्वरित गोल केले. भारताने या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखत मलेशियाला गोल करण्याची संधीच दिली नाही. भारतीय महिलांची पुढील लढत कोरियाविरुद्ध रविवारी होणार आहे.