पुणे / प्रतिनिधी :
अंमळनेर येथे नियोजित असणाऱ्या आगामी 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड उद्या (ता. 25) होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात होणाऱ्या बैठकीत संमेलनाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. तसेच संमेलनाच्या तारखांसह या संमेलनातील कार्यक्रमांच्या रुपरेषाही याच बैठकीत निश्चित होईल.
वर्धा येथील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जेमतेम पाच महिने झाले असतानाच महामंडळाने पुढील संमेलनाची तयारी सुरू केली आहे. वर्धा येथे झालेल्या संमेलनातील असुविधांवर बरीच चर्चा झाल्याने महामंडळाने यावेळी सावध पवित्रा घेतला आहे. आयोजकांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी संमेलनाच्या तारखा व कार्यक्रम पत्रिका लवकरात लवकर निश्चित करण्याचे महामंडळाने ठरवले आहे. त्याअंतर्गत रविवारी ही बैठक होत आहे यापूर्वी पुण्यामध्येच झालेल्या बैठकीत संमेलनस्थळ म्हणून अंमळनेरची निवड करण्यात आली होती. अंमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ ही या संमेलनाची आयोजक संस्था आहे.
दरम्यान, रविवारच्या (ता. 25) बैठकीला महामंडळाच्या सर्व घटक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत कार्यक्रमाच्या रुपरेषेचा आराखडा तयार करण्यात येईल. हा आराखडा सादर होऊन मंजूर केला जाणार आहे. तसेच मुख्य बैठकीतच सर्व घटक संस्था संमेलनाध्यक्षपदासाठी आपल्या नावांचे प्रस्ताव सुचवतील. त्यातून एका नावावर शिक्कामोर्तब होईल. साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, कथाकार डॉ. रवींद्र शोभणे यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.