प्रतिनिधी /खानापूर
राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धा दोड्डबळ्ळापूर (बेंगळूर) येथे होणार आहेत. या थ्रो बॉल स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खानापूर येथील मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य एन. ए. पाटील उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे खानापूर तालुका तरुण भारतचे वार्ताहर विवेक गिरी, मराठा मंडळ संस्थेचे कार्यकारी संचालक शिवाजीराव पाटील उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत प्राध्यापक टी. आर. जाधव यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना पुष्पगुच्छ देण्यात आले. संघाबरोबर जाणारे टीम मॅनेजर, टीम प्राध्यापिका मनीषा एलजी, प्राध्यापक आय. सी. सावंत, प्रशिक्षक भीमसेन या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
प्रमुख पाहुणे विवेक गिरी यांनी आपल्या भाषणातून ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गौरव केला व थ्रोबॉल संघाचे नेतृत्व करणाऱया खेळाडूंचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य एन. ए. पाटील म्हणाले, आपल्या कॉलेजचे हे देदीप्यमान यश पाहून मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू (हलगेकर) यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. राज्यस्तरीय पातळीवर होणाऱया थ्रो बॉल स्पर्धेमध्ये हमखास यश मिळवावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्राध्यापक एन. एम. सनदी यांनी केले.