संचालक मंडळाला मान्यवरांकडून शुभेच्छा : प्रतिष्ठित वित्तीय संस्थेकडून 150 कोटींचा टप्पा पार
बेळगाव : पायोनियर बँकेच्यावतीने बुधवारी ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर व सौहार्द फेडरेशनचे उपनिबंधक रविंद्र पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात 75 वर्षांवरील ज्येष्ठ सभासदांसोबत सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. किरण ठाकुर म्हणाले, बेळगावमधील एक प्रतिष्ठित वित्तीय संस्था म्हणून पायोनियर बँकेकडे पाहिले जाते. या संस्थेने बेळगाव शहराला तीन आमदार दिले. पायोनियर बँकेमध्ये संचालक म्हणून काम करणे म्हणजे प्रतिष्ठेची बाब होती. आज या संस्थेने अनेक बदल करत 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. यापुढेही या संस्थेची अशीच प्रगती होत राहो व असेच सामाजिक कार्य संचालक मंडळ करत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. व्यासपीठावर पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर, उपाध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, संचालक अनंत लाड व सीईओ अनिता मूल्या उपस्थित होते. सामाजिक कार्याबद्दल नागरत्ना, कस्तुरी, निसार, शंकर कोलकार व माजी महापौर विजय मोरे यांचा सत्कार करण्यात आला. रविंद्र पाटील यांनी संस्थेचे कौतुक करत मागील 100 वर्षांत व्यवस्थितपणे आर्थिक व्यवहार केल्याबद्दल संचालकांचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे भागधारक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.