बँकिंगसह विविध क्षेत्रांमध्ये तेजी :निफ्टी 272अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्सने तब्बल 900 अंकांची उसळी घेतली आहे. शुक्रवारच्या सत्रात इतकी मोठी कामगिरी करण्यासाठी बाजारातील बँकिंगसह अन्य काही क्षेत्रात झालेल्या लिलावाचा मोठा फायदा भारतीय बाजाराला झाल्याची नोंद करण्यात आली.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 899.62 अंकांनी वधारुन निर्देशांक 59,808.97 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 272.45 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 17,594.35 वर बंद झाला आहे.
प्रमुख क्षेत्राची स्थिती पाहिल्यास यामध्ये अदानी समूहासह बँकिंग व अन्य महत्त्वाच्या क्षेत्रात लिलाव झाल्यामुळे सेन्सेक्समधील निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. यावेळी जागतिक पातळीवरील घडामोडींचाही सकारात्मक परिणाम भारतीय बाजारात झाला आहे. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्राईजेसचे समभाग हे सर्वाधिक 16.60 टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचले. यासोबत अदानी पोर्ट्स, स्टेट बँक, भारती एअरटेल व स्टेट बँक लाईफ यांचे समभाग वधारुन बंद झाले आहेत.
या समभागात घसरण……
निफ्टीमधील टेक महिंद्राचे समभाग हे शुक्रवारी सर्वाधिक 2.09 टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत. यावेळी अल्ट्राटेक सिमेंट, सिप्ला, डिव्हीस लॅब आणि नेस्ले इंडियाचे समभाग प्रभावीत झाले.
….या कारणांमुळे बाजार मजबुत
शुक्रवारच्या सत्रात फेडरल रिझर्व्हचे प्रमुख राफेल बॉस्टीक यांच्या सकरात्मक विधानानंतर ट्रेडर्समध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. कारण फेडरल रिझर्व्ह आगामी काळात व्याजदरामध्ये केवळ 0.25 टक्क्यांची वृद्धी करणार आहे. यामध्ये गुंतवणुकदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आगामी आठवड्यातही तेजीची स्थिती कायम राहणार का हे पहावे लागणार आहे.
2.जागतिक बाजार
वॉल स्ट्रीटवर रात्रीच्या सत्रातील तेजीनंतर आशियातील शेअर बाजारात तेजी दिसून आली. त्यामुळे याचा फायदा हा देशातील बाजाराला अधिक झाला असल्याचे दिसून आल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
3.रुपयाची मजबुती
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत राहून तो एक महिन्याच्या उच्चांकावर राहिला होता. डॉलरच्या तुलनेत रुपया 0.32 टक्क्यांनी वधारुन 82.33 वर पोहोचला आहे.
4.अदानी समूहातील तेजीची उसळी
अदानी समूहातील लिस्टेट कंपन्यांचे समभाग शुक्रवारी मजबूत स्थितीत राहिले होते. अदानी एंटरप्राईजेसमध्ये 13 टक्क्यांची तेजी मिळाली.
5.बँकिंगची भरारी
दलाल स्ट्रीटवर बँकिंग क्षेत्रातील समभागांनी शुक्रवारी तेजीची उसळी प्राप्त केली. निफ्टीमधील बँकमध्ये दोन टक्क्यांची तेजी दिसून आली.