सेरो व महिंद्रा समूह व सरकारी मालकीची एमएसटीसी यांचा संयुक्त उपक्रम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सेरो, महिंद्रा समूह आणि सरकारी मालकीच्या एमएसटीसी यांचा 50:50 चा एक संयुक्त उपक्रम असून यांच्या अंतर्गत येत्या 2025 पर्यंत भारतात किमान 100 वाहन स्क्रॅपिंग केंद्रे स्थापन करण्याची योजना आखण्यात येणार असल्याची माहिती सेरोचे संचालक सुमित इस्सार यांनी दिली आहे.
इस्सारने किती रक्कम याकरीता देणार ही बाब उघड न करता त्यांनी ही केंद्रे स्थापन करण्यासाठी कंपनीला मोठी गुंतवणूक आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सध्या भारतात वाहन स्क्रॅपिंगसाठी एकूण 13 ते 15 नोंदणीकृत केंद्रे आहेत. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, प्रदूषित जुन्या वाहनांना बदलणे हा भारतीय अर्थव्यवस्थेला हरित करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि केंद्र सरकारने जुनी वाहने स्क्रॅप करण्यासाठी पुरेसा निधी दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे जुनी वाहने आणि रुग्णवाहिका बदलण्यासाठी राज्य सरकारांनाही मदत करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.
दरवर्षी विकल्या जाणाऱ्या सुमारे 40 लाख नवीन गाड्यांपैकी 10 ते 15 टक्के सरकार खरेदी करते. इस्सार म्हणाले की, उर्वरित 35 लाख कार किरकोळ बाजारात विकल्या जातात. रिटेल क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर भागीदारी करावी लागणार आहे.
किमान 200 केंद्रे असावी
भारतातील सर्व प्रमुख शहरे समाविष्ट करण्यासाठी किमान 200 केंद्रे असली पाहिजेत. इस्सार हे महिंद्रा एक्सेलोचे व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. 2017 मध्ये भारतात 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची संख्या 2.8 कोटी होती. पुढील पाच वर्षांत ही संख्या 4.6 कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले की, 2025 पर्यंत महिंद्रा एक्सेलो आणि एमएसटीसी यांनी संयुक्तपणे देशभरात 100 ते 150 केंद्रे ठेवण्याचे निश्चित केले आहे.