‘रोटरी क्लब ऑफ बेळगाव’चा पुढाकार
बेळगाव : महापालिकेच्यावतीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहेत. याचप्रमाणे आता कॅन्टोन्मेंट परिसरातील तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने याकरिता अनुदान देण्यात येणार आहे. 1 कोटी 11 लाख ऊपये तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीचा अंदाजे खर्च आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातील सांडपाणी नाले आणि डेनेजवाहिन्यांद्वारे सोडले जाते. सदर सांडपाणी नाल्याद्वारे नद्यांमध्ये मिसळत आहे. तसेच काही ठिकाणी विहिरी आणि कूपनलिकांमध्ये सांडपाणी पाझरत असल्याने पाणी दूषित होत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डने घेतला आहे. बहुतांश ठिकाणी कॅन्टोन्मेंट परिसरातील सांडपाणी नाल्यामध्ये सोडले जाते. परिणामी पाणी दूषित होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सध्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडे निधी नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ यांनी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. कॅन्टोन्मेंट परिसरात तीन ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. एकूण 190 केएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता या तिन्ही प्रकल्पांची असणार आहे. कॅन्टोन्मेंटच्यावतीने पाच वर्षांच्या कराराने हा प्रकल्प उभारणीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 1 कोटी 11 लाख 80 हजार ऊपये अंदाजे खर्च अपेक्षित असून कॅन्टोन्मेंटने एमओयू करार केल्यानंतर सहा महिन्यांमध्ये या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे.
पाण्याचा पुनर्वापर केला जाणार…
कॅन्टोन्मेंटतर्फे किल्ला येथील जनावरांचा बाजार, संचयनी चौक, तसेच आणखी एका ठिकाणी या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. आगामी पाच वर्षांच्या कालावधीकरिता देखभालीची जबाबदारी रोटरी क्लबची असणार आहे. सामाजिक हितासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर मिळणाऱ्या शुद्ध पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी किंवा उद्यान, बांधकाम अशा विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो. या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार असल्याचे कॅन्टोन्मेंट बैठकीत सांगण्यात आले.