प्रतिनिधी / सातारा :
Shambhuraj desai : नव्याने स्थापन झालेल्या फडणवीस-शिंदे सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार अद्याप बाकी आहे. या सरकारमध्ये सर्वांना समावून घेणार आहे. आता छोटा विस्तार झाला आहे. अजून काही पदे रिक्त आहेत. यावेळी मंत्रीपदी महिला नेत्याची वर्णी लागणार आहे, असा संकेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिले. मंत्री देसाई यांनी गणशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी मंत्री देसाई म्हणाले, सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सवासाठी विविध परवान्यांची आवश्यकता असते. यासाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे. याद्वारे गणेश मंडळांना तात्काळ परवानग्या मिळाल्या आहेत. गणेशोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभागाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारींनी आपापल्या हद्दीत सार्वजनिक गणेश मंडळाची बैठका घेऊन त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या आहेत. तरी जिह्यातील नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करुन जिल्हा प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अधिक वाचा : टोल व्यवस्थापनाकडून गणेशभक्तांची लूट, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली
कास पठारावरील बांधकामांविषयी ते म्हणाले, यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. मी जिल्ह्यातील मंत्री म्हणून त्यांनी हा मला विषय सांगितला नाही. कदाचित ते हायकामांडशी बोलत असतील. त्यामुळे मला या प्रकरणाची पूर्ण माहिती नाही. पण, येथे कायद्याचे उल्लंघन होत असेल ते खपवून घेतले जाणार नाही. मी कधीही कासला जात नाही, त्यामुळे तेथील माहिती मला नाही. पण प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांनी पहाणी केली असून, त्यांचा अहवाल ते देतील, तो पाहून आम्ही काय ती कारवाई करू. राज्य उत्पादन शुल्क विभागात मनुष्यबळ कमी असल्याने त्यांच्या कारवाई कमी दिसतात. जिल्ह्यात या विभागात केवळ 43 कर्मचारी असून एकुण 789 दुकाने आहेत. त्यामुळे लवकरच उत्पादन शुल्क विभागात कर्मचारी भरती होईल.
थोरली शिवसेना आमचीच
मुख्यमंत्र्यांच्या महाबळेश्वर येथील एका हॉटेलमधील मुक्कामाविषयी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहितेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेविषयी विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, कोण मोहिते, आमचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख तिथे बसलेत. मुळात आमची शिवसेना थोरली आहे. कारण 55 पैकी 40 आमदार व 18 पैकी 12 खासदार आमचे असल्याने आमचीच शिवसेना थोरली आहे. दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आता आमचा मंत्रीमंडळाचा छोटा विस्तार झाला आहे. लवकरच आणखी विस्तार होईल त्यामध्ये सर्व घटकांना सामावून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतील.