शिरढोण प्रतिनिधी
शिरढोण (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायतीने गावात दारुबंदीच्या ठरावासाठी बोलाविण्यात आलेल्या महिला ग्रामसभेत ठरावावरुन दोन गटात राडा झाला. विरोधात तसेच समर्थनार्थ वादावादीतून धक्काबुक्की करत हाणामारीचा प्रकार झाला. गोंधळात प्रोसिंडींगही फाडण्यात आली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर गोंधळातच दारुबंदीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच बाबासो हेरवाडे होते.
२०१६ साली गावात महिला ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव करण्यात आला होता. गावात दोन व्यावसायिकांनी परमिट रूम साठी परवाना मागितल्याने सदस्यांनीच याला विरोध केल्याने महीला ग्रामसभेच्या विषय पत्रिकेवर विषय घेऊन निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले होते. यासाठी सोमवारी दुपारी दोन वाजत ग्रामपंचायतीसमोर महीला ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांबळे यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचताच उपस्थित बहुतांश महीलांनी दारुबंदी कायम करण्याच्या ठरावाला हात वर करुन मंजूरी दिली. मात्र माजी जिल्हा परिषद सदस्या रंजना कोळी यांनी आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही महीलांनी विरोध केल्याने शाब्दिक वादावादीतून धक्काबुक्की करत हाणामारी सुरू झाली.
सरपंच हेरवाडे यांनी महिलाना शांततेचे आवाहन केले मात्र गोंधळात पुरुषांनी भाग घेतल्याने वाद अधिकच पेटला. वादावादीतून सभेच्या टेबलावरील प्रोसिंडींगही फाडण्यात आली. काही वेळाने कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस. बीट आमलदार अरुण नागरगोजे पोलिस फौजफाटा घेऊन आले. पोलिसांनी पुरुषांना सभेपासून बाजूल हाकलून सभेला सुरवात झाली.
सरपंच हेरवाडे यांनी गावातील दारुबंदीचा ठराव कायम करण्याचा विषय वाचताच बहुतांश महीलांनी हात वर करून मंजुरी दिली. तर काही महीलांनी म्हणणे मांडण्याचा पुन्हा प्रयत्न केल्याने महीलांतून वाद सुरू झाल्याने सरपंच हेरवाडे यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. सभेला उपसरपंच रेश्मा चौधरी, भारती मगदूम, संगीता मगदूम, शर्मिला टाकवडे, तेजस्विनी पाटील, संगीता चौताळे, अनिता मोरडे, पोलीस पाटील अनुराधा जाधव यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.
दारु बंदी ठरावावर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाचे मत विचारात घेऊन ठरावावर एकमत होणे आवश्यक असताना आमचे म्हणणे ऐकून न घेता गोंधळात ठराव केला सदरची सभा ही कायदेशीर नसून बेकायदेशीर आहे
सौ. रंजना सूर्यकांत कोळी– माजी जि. प सदस्य
कोरम पूर्ण झाल्यानंतर महिला ग्रामसभा घेण्यात आली असून सदरची ग्रामसभा कायदेशीर आहे.दारु बंदी ठरावावर महिलांनी हात उंच केल्यानंतर बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला
बाबासाहेब हेरवाडे- सरपंच ग्रामपंचायत शिरढोण