वृत्तसंस्था/ शिलाँग
आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहावेळा जेतेपद पटकावणारा शिवा थापा (63.5 किलो) व वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविणारा अमित पांघल (51 किलो गट) यांनी पुरुषांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात केली.
आसामच्या शिवा थापाने हिमाचल प्रदेशच्या अभिनाश जमवालवर 4-3 अशा गुणांनी संघर्षपूर्ण विजय मिळविला. त्याची पुढील लढत हरियाणाच्या संतोष एचकेविरुद्ध होईल. एसएससीबीच्या अमित पांघलने महाराष्ट्राच्या शिवाजीवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. त्याची पुढील लढत पंजाबच्या जयशनदीप सिंगविरुद्ध होईल.
अन्य लढतीत हिमाचलचा ऑलिम्पियन आशिष कुमारने (80 किलो) पंजाबच्या अर्शदीप सिंगवर विजय मिळवित उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. त्याची पुढील लढत चंदिगडच्या नितिश कुमारशी होईल. रेल्वे क्रीडा मंडळाच्या गोविंद सहानीनेही 48 किलो वजन गटातील लढतीत त्रिपुराच्या सायन लोधचा पराभव केला. गोविंदची पुढील लढत हिमाचल प्रदेशच्या विशालशी होईल.