वार्ताहर /हिंडलगा
आंबेवाडी येथील श्री राजा छत्रपती दत्त युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चंदगड तालुक्यातील काळा नंदीगड इथून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा करून सकाळी सूर्योदयाला हे सर्व मावळे गुऊवार दि. 9 रोजी हजर झाले. यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून ही ज्योत फिरवण्यात आली. नवी गल्ली, माऊती गल्ली, गणपत गल्ली, रामदेव गल्ली, घळगेश्वर गल्ली आदी प्रमुख मार्गावरून ज्योत फिरवण्यात आली. गावातील घळगेश्वर मंदिर, माऊती मंदिर, गणपती मंदिर, दत्त मंदिर या ठिकाणी जाऊन मूर्तीची पूजा करण्यात आली. ठिकठिकाणी या शिवज्योतीचे सुवासिनी महिलांनी निरांजन ओवाळून स्वागत केले. शेंदूर तिलक लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणानी परिसर दणाणून सोडला. आंबेवाडी गावात गुरुवारीच मसनाई मूर्तीची मिरवणूक चालू असल्यामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे एकच गर्दी या ठिकाणी दिसून आली. गावात स्वागताचे फलक लावण्यात आल्यामुळे सर्वत्र उत्साह दिसून येत होता, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून आरती म्हणून पारंपरिक पद्धतीने शिवरायांची जयंती साजरी केली. सर्व मावळे काळा नंदीगड येथील किल्ल्यावर ज्योत आणण्यासाठी गेले होते. ही ज्योत आंबेवाडी येथे आणत असताना ठिकठिकाणी ज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.