वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमली पदार्थप्रकरणी अडचणीत असलेले पंजाबमधील दिग्गज अकाली नेते विक्रम मजीठिया यांना मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. अकाली नेत्याने अमली पदार्थ संबंधित गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाकडे दाद मागण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. मजीठियावर काँग्रेसचे सरकार असताना हा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सध्या ते पतियाळा तुरुंगात कैद आहेत.
पंजाबमध्ये सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने याप्रकरणातील विशेष तपास पथकात बदल केला आहे. नवे पथक पोलीस महानिरीक्षक गुरशरन सिंह संधू यांच्या देखरेखीत तपास करत आहे. तर एसआयटीचे प्रमुख म्हणून आयपीएस अधिकारी एस. राहुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.