ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत त्यांची तुलना शो मॅन राजकपूर यांच्याशी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करून अजितदादांना प्रत्युत्तर दिलं आहे.
श्रीकांत शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा… हा ‘शो’ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा! आणि हो… हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘टेलर’नेच धडकी भरली? पिक्चर अभी बाकी है”
श्रीकांत शिंदे यांनी या ट्विटमधून अजितदादांच्या वर्मावर घाव घालण्याचं काम केलं आहे. तसेच आमची युती आणि सरकार भक्कम पायावर उभं आहे, असंही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाले होते अजितदादा?
अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत आहे. आम्हीही दर्शनाला जात असतो. पण कधी कॅमेरा घेऊन जात नाही. आता कॅमेरे लावले जातात, बरोबर गाडी थांबते, बरोबर कुणी तरी उतरतो, मग एंट्री होते. कशाला या सगळय़ा गोष्टी पाहिजे. तुमचं तुमच्याकडे ठेवा. पूर्वी शो मॅन होते राजकपूर, आता तसे काही जण दिसत आहेत, असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला होता. अजितदादांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांकडूनही उत्तरं मिळत आहेत. पण आज त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनीही आज अजितदादांना ट्विटमधून प्रत्युत्तर दिलं.