मंत्री जोल्ले यांची पत्रकार परिषदेत माहिती : गर्भवतींसाठी प्रथमच निवासी गर्भसंस्कार विभाग
प्रतिनिधी / बेळगाव
कणेरी येथील प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्त्वावर चालणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ येथे धर्मादाय श्रेणीतील पहिले ‘सिद्धगिरी जननी’ या आयव्हीएफ टेस्टट्यूब बेबी सेंटरचा लोकार्पण सोहळा रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती धर्मादाय हज व वक्फ बोर्डाच्या मंत्री शशिकला जोल्ले आणि
जननी विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शशिकला जोल्ले म्हणाल्या, अपत्य प्राप्तीसाठी आज अनेक दांपत्ये उपचार घेत आहेत. मात्र, आयव्हीएफ तंत्रज्ञानाने उपचारपद्धती अतिशय महाग आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तिचा लाभ मिळत नाही. म्हणूनच सिद्धगिरी रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालणाऱ्या योजनेंतर्गत जननी विभाग सुरू होत आहे. यासाठी अत्यंत कमी दरामध्ये दांपत्यांवर उपचार केले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, जगात आणि देशात प्रथमच अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि योग या तिन्ही
पॅथींच्या माध्यमातून उपचार केले जातील. शिवाय गर्भसंस्कार केले जातील.
आज अनेक आश्रमांमध्ये निराधार मुले आहेत. त्यांना दत्तक घेण्याचा विचार का रुजवत नाही? या प्रश्नावर त्याचाही आपण प्रसार करू. मात्र आपलेच मूल असावे, ही मानसिकता समाजात आजही आहे. तथापि, महागड्या उपचार पद्धती परवडत नसल्यामुळे अनेक दांपत्ये वंचित राहतात. त्यांच्यासाठी जननी लाभदायक ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा पाटील यांनी काडसिद्धेश्वर स्वामी व जोल्ले ग्रुपच्या सहकार्याने जननी विभाग सुरू होत आहे. प्रत्येक दांपत्याला सर्व माहिती प्रथम दिली जाईल आणि आधुनिक तंत्रज्ञान, आयुर्वेदिक चिकित्सा यांच्या एकत्रित उपचारामुळे वंध्यत्व निवारण होण्यास मदत होईल, असे सांगितले. त्यांनी या विभागामध्ये कोणत्या सुविधा आहेत, याची माहिती देऊन गर्भवतींसाठी प्रथमच निवासी गर्भसंस्कार विभाग कार्यान्वित होत असल्याचे सांगितले.