वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अझरबैजानमधील बाकू येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन नेमबाजी प्रकारात भारताची अनुभवी नेमबाज अंजुम मुदगिलने रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारताने तिसरे स्थान मिळविले आहे.
शुक्रवारी या स्पर्धेत झालेल्या महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारातील अंतिम फेरीत डेन्मार्कच्या रिकी इब्सेनने अंजुम मुदगिलचा 16-12 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. अंजुमला या क्रीडाप्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंजुम मुदगिलचे विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील हे वैयक्तिक दुसरे रौप्यपदक आहे.
पुरूषांच्या सांघिक 3 पी नेमबाजी प्रकारात भारताच्या स्वप्निल, दीपक कुमार आणि गोल्डी गुर्जरने रौप्यपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारातील अंतिम लढतीत क्रोएशियाने भारताचा 17-7 असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. या क्रीडाप्रकारात युक्रेनने कांस्यपदक घेतले. गुरूवारी पुरूषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या स्वप्निल कुसाळेने रौप्यपदक मिळविले होते. आतापर्यंत या स्पर्धेत भारताने पदव तक्त्यात तिसरे स्थान घेतले असून त्यांनी एक सुवर्ण आणि तीन रौप्यपदके मिळविली आहेत. कोरिया पहिल्या, सर्बिया दुसऱया स्थानावर आहे. या स्पर्धेत भारताचा 12 जणांचा संघ सहभागी झाला आहे.