आम आदमी पक्षाला धक्का, सिसोदियांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरात गाजत असलेल्या दिल्लीतील मद्यधोरण घोटाळय़ात रविवारी अटक करण्यात आलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात जामीनावर सुटका करुन घेण्यासाठी अर्ज केला होता. तथापि, त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगून त्यांचा अर्ज नाकरण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी सिसोदिया यांनी दिल्ली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे.
सिसोदिया यांच्या अर्जावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील पीठासमोर सुनावणी झाली. आपल्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आताच येण्याचे कारण नाही. जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जावे. प्रत्येक प्रकरणी त्वरित सर्वोच्च न्यायालयात येण्याचे कारण नाही. असा निर्णय त्यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
पाच दिवसांची कोठडी
सिसोदिया यांना रविवारी आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. सोमवारी त्यांना दिल्लीतील रोझ ऍव्हेन्यू न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. सीबीआयने न्यायालयाकडे त्यांची पाच दिवसांची कोठडी मागितली होती. सीबीआयने सादर केलेल्या प्रकरणात प्रथमदर्शनी तध्य असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांना पाच दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला.
सहकार्य केले होते
सीबीआयने या प्रकरणात सिसोदिया यांची चौकशी केली होती. चौकशीत त्यांनी पूर्ण सहकार्य केले होते. त्यांनी धारण केलेले मौन हे त्यांना अटक करण्याचे कारण होऊ शकत नाही. चौकशीच्या काळात आरोपीला गप्प बसण्याचा अधिकार आहे. तोच्<ा त्यांनी उपयोगात आणला होता, त्यांची अटक बेकायदेशीर आहे. ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या अर्जात करण्यात आली होती.
चुकीचा पायंडा पडेल
सिसोदिया यांच्यावर दाखल करण्यात आलेले प्रकरण भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत आहे. अशा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप केल्यास तो चुकीचा पायंडा ठरणार आहे. त्यामुळे आम्ही आत्ताच या प्रकरणाचा विचार करु शकत नाही. आपण उच्च न्यायालयात जाऊ शकता, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण
काही काळापूर्वी दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या राज्यसरकारने राज्याचे मद्यधोरण शिथील केले होते. या नव्या धोरणाचा अवैध लाभ सिसोदिया आणि त्यांच्या पक्षाच्या अन्य नेत्यांच्या निकटवर्तीय मद्य व्यापाऱयांना मिळाल्याचा आरोप आहे. तसेच या व्यापाऱयांकडून घेतलेल्या मोठय़ा रकमेचा उपयोग गोवा आणि गुजरात येथील विधानसभा निवडणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणात करण्यात आला, असाही आरोप सीबीआयने ठेवला आहे. या प्रकरणी काही मद्य व्यापाऱयांनाही अटक करण्यात आली असून सिसोदियांचा निकटवर्तीय मानला गेलेला एक आरोपी माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याची चर्चा आहे. या आरोपीने अन्य आरोपी आणि या घोटाळय़ाच्या मुख्य सूत्रधारांच्या विरोधात अनेक महत्वाचे गौप्यस्फोट पोलिसांजवळ केले आहेत, अशीही चर्चा आहे. याच माहितीच्या आधारावर सिसोदिया यांना सोमवारी अटक करण्यात आली होती.
सिसोदियांचा राजीनामा
सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्जाचा विचार करण्यास नकार दिल्यानंतर त्वरित केजरीवाल यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अन्य एका प्रकरणात अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंदर जैन यांचाही राजीनामा मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वीकारला आहे. अशा प्रकारे आतापर्यंत केजरीवाल मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांवर भ्रष्टाचार आरोपांमध्ये कारवाई झालेली आहे.