आठ दिवसांत जंगलात बनवला कच्चा रस्ता
प्रतिनिधी/ म्हापसा
नागवा हडफडे पंचायत क्षेत्रात लागून असलेल्या सीमवाडा हडफडे बॉडर्रवर सर्वे क्र. 57/1 मध्ये अज्ञात बिल्डरने बांधकाम करण्याचा डाव आखून मोठ्या प्रमाणात जंगली झाडांची कत्तल केल्याचे आढळून आले आहे. इतकेच नव्हे तर या जंगल परिसरात आतमध्ये जेसीबीच्या साहाय्याने सुमारे दीडशे मीटर लांब कच्चा रस्ताही बनविला आहे. या जंगल भागात हजारहून अधिक जंगली झाडांची कत्तल केल्याचे पाहायला मिळाले. याची दखल घेत शनिवारी सकाळी कळंगुटचे आमदार मायकल लोबो, हडफडे सरपंच रोशन रेडकर व पंचायत मंडळ आदींनी येथे येऊन पाहणी केली. यावेळी आमदार लोबोंनी या गोष्टीचा निषेध करीत दोषींवर कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.
शनिवारी कत्तल केलेल्या झाडांची पाहणी केल्यावर आमदार लोबो यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पंचसदस्य राजेश मोरजकर, उपसरपंच सुष्मा नागवेकर, पंच सखाराम शिरोडकर, पंच अनिकेत शिरोडकर, सचिव रघुवीर बागकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाय वनाधिकारी तारी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकारीही उपस्थित होते.
हडफडे येथील श्री देव चौरंगीनाथ मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या 11 हजार चौ.मी.च्या डोंगराळ भागात अज्ञात बिल्डरकडून तेथील लहान मोठ्या झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आल्याचे येथे दिसून आले. दरम्यान कत्तल करण्यात आलेल्या झाडांचे ओंडके तेथील परिसरात टाकून दिल्याने तेथील परिसराची बकाल अवस्था झाल्याचे आढळून आले.
डोंगर कापणी आणि झाडांची कत्तल स्थानिक पंचायत मंडळाला अंधारात ठेवून अज्ञात बिल्डरकडून करण्यात आलेले आहे. वनमंत्री विश्वजित राणे सध्या गोव्याबाहेर असल्याते ते गोव्यात आल्यावर हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालण्यात येणार असल्याची माहिती आमदार लोबो यांनी दिली.
झाडांच्या कत्तलीबाबत पंचायत मंडळ अंधारात : सरपंच रोशन रेडकर
दरम्यान, हे बांधकाम करीत असताना आम्हा स्थानिक पंचायतीला विश्वासात घेण्यात आलेले नाही वा याबाबत कुणालाच माहिती नसल्याचे सरपंच रोशन रेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आठ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असावा. गावातील दोघा नागरिकांनी जंगलात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केल्याची माहिती आपणास दिली. पंचायत मंडळाने लगेच स्थानिक आमदार मायकल लोबो यांना सदर माहिती दिल्याचे सरपंचांनी सांगितले.1