2014 नंतर सर्वात कमी शिपमेंट ः कौंटर पॉइंटचा अहवाल सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्मार्टफोनची बाजारपेठ ही जागतिक स्तरावर वर्षाच्या आधारावर पाहता 12 टक्के इतकी कमकुवत दिसली आहे. तिसऱया तिमाहीत 30 कोटी स्मार्टफोन्सची शिपमेंट झाली आहे. 2014 नंतरची ही सर्वात कमी संख्या नोंदली गेल्याची माहिती आहे.
कौंटरपॉइंट रिसर्चच्या मते, स्मार्टफोन्सची बाजारपेठ जागतिक स्तरावर सध्या दबावात कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय गोंधळामुळे आर्थिक अस्थिरतेच्या कारणास्तव स्मार्टफोन्सची मागणी प्रभावीत झाली आहे. ऍपल आणि सॅमसंग या कंपन्या स्मार्टफोन्स शिपमेंटमध्ये आघाडीवर राहिल्या आहेत. रशिया-युक्रेन यांच्यात न थांबलेले युद्ध, चीन-अमेरिका यांच्यातील राजकीय ताणाताणी, महागाईची वाढती टांगती तलवार, देशाच्या चलनांमध्ये दिसणारी घसरण याचा परिणाम स्मार्टफोन मागणी घटण्यावर दिसला.
ऍपल आघाडीवर
आघाडीवरच्या पाच कंपन्यांमध्ये ऍपलने वार्षिक तत्त्वावर 2 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. सॅमसंगची शिपमेंट वर्षाच्या आधारावर 8 टक्के घटली असली तरी तिमाहीच्या तुलनेत 5 टक्के वाढली आहे. 6 कोटी 40 लाख स्मार्टफोन्सची शिपमेंट करण्यात आली आहे. शाओमी, ओप्पो आणि विवो यांना काहीसा व्यवसाय सावरता आला आहे.