करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील केम येथील खून प्रकरणात पाच जणांविरुद्ध करमाळा पोलिसात आज गुन्हा दाखल झाला आहे. भीमराव नामदेव तळेकर, दत्तात्रय भीमराव तळेकर, अमोल दत्तात्रय तळेकर, मंगल दत्तात्रय तळेकर व निर्मला दत्तात्रय तळेकर (सर्व रा. केम) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणात करमाळा पोलिसांनी तीन संशयित आरोपींना तपास करून तत्काळ अटक केली असून दोघांचा शोध सुरु आहे. यामध्ये खून झालेल्या अमोल सुधीर तळेकर यांचे वडील सुधीर अर्जुन तळेकर (वय ५०, रा. केम) यांच्या फिर्यादीवरून बुधवारी (ता. २७) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
केम येथे बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अमोल सुधीर तळेकर यांचा शेतातील रस्त्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आणि त्यातच खून झाला. खुनाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून तिघांना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी सुधीर तळेकर यांच्याकडे एक ट्रॅक्टर आहे. त्यांना दोन मुले आहेत. यातील अमोल हा ट्रॅक्टर चालवत होता. त्यांच्या शेता शेजारी त्यांचे चुलते भिमराव नामदेव तळेकर यांची शेती आहे. त्यांच्या शेतातून जाण्यासाठी त्यांना कच्चा रस्ता आहे. त्यांच्या घरापासून काही अंतरावर संशयित आरोपी भीमराव तळेकर हे कुटुंबासह राहतात. त्या दोघांमध्ये सामायिक रस्त्यावरून नेहमी वाद होत होते.
बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ते घरा समोर थांबलेले असताना फिर्यादीचा मुलगा अमोल (मृत) हा ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन घराकडे येत होता. तेव्हा घराच्या बाजूला असलेल्या सामायिक रस्त्याच्या वळणावर ट्रॅक्टर ट्रॉली जात असताना संशयित आरोपी भीमराव तळेकर याने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या लाकडावर ट्रॅक्टर का घातला म्हणून शिवीगाळ केली. ‘तू आमच्या लाकडावर ट्रॅक्टरचे चाक घातले’ असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर आवाज ऐकून फिर्यादी सुधीर व त्यांचा दुसरा मुलगा हे घटनास्थळी गेले. ‘लाकूड व्यवस्थित करून देतो,’ असे ते म्हणाले.
दरम्यान भीमराव तळेकरच्या मोठ्या आवाजामुळे त्याच्या घरातील त्यांची पत्नी, सून व मुलगा दत्तात्रय व नातू अमोल दत्तात्रय तळेकर हे तेथे आले. तेव्हा संशयित आरोपी अमोल दत्तात्रय तळेकरच्या हातामध्ये कोयता होता. तो कोयता फिर्यादी सुधीर यांनी हिसकावून घेतला. त्याच दरम्यान भिमराव नामदेव तळेकर याने खून झालेला मुलगा अमोल याला खाली पाडले. महिलांनी त्याचे हात व दत्तात्रय भीमराव तळेकर व त्याचा मुलगा अमोल यांनी त्याचे पाय पकडले. त्या दरम्यान संशयित आरोपी अमोल दत्तात्रय तळेकर याने घरातून एक गुप्ती सारखे लांब लोखंडी हत्यार आणून त्याच्या छातीतमध्ये खोलवर भोकसले. त्यानंतर क्षणातच मुलगा निपचित पडला, असे फिर्यादीत म्हटले आहे. मुलगा खाली निपचित पडल्याचे पाहून संशयित आरोपी भांडणाच्या ठिकाणावरून पळून गेले. त्यानंतर मुलाला करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.