वृत्तसंस्था/ सिडनी
सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीत शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव गडगडला. दक्षिण आफ्रिकेने दिवसअखेर पहिल्या डावात 59 षटकात 6 बाद 149 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ अद्याप 226 धावांनी आघाडीवर आहे. या कसोटीतील खेळाचा एक दिवस बाकी असून हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता अधिक आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे.
ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 131 षटकात 4 बाद 475 धावावर घोषित केला. उस्मान ख्वाजाने नाबाद 195 तर स्टीव्ह स्मिथने 104 तसेच लाबुशेनने 79 आणि हेडने 70 धावा जमवल्या. या कसोटीतील खेळाचा संपूर्ण तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला होता. तर शनिवारी पुन्हा पावसाचा अडथळा आल्याने केवळ 59 षटकांचा खेळ झाला.
कमिन्स आणि हॅझलवुड यांच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवातीपासूनच गळती सुरू झाली. त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. हॅझलवुडने नवव्या षटकात कर्णधार एल्गारला झेलबाद केले. त्याने 2 चौकारासह 15 धावा केल्या. फिरकी गोलंदाज लियॉनने इर्वीचा त्रिफळा उडवला. त्याने 2 चौकारासह 18 धावा केल्या. कमिन्सने क्लेसनला 2 धावावर झेलबाद केले. दक्षिण आफ्रिकेची स्थिती यावेळी 3 बाद 37 अशी होती. बहुमा आणि झोंडो यांनी चौथ्या गडय़ासाठी 48 धावांची बर घातली. हॅझलवुडने बहुमाला कॅरेकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 74 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 35 धावा जमवल्या. कमिन्सने यानंतर झोंडोला पायचित केले. त्याने 2 षटकार आणि 2 चौकारासह 39 धावा जमवल्या. वेरेनीने 2 चौकारासह 19 धावा केल्या. कमिन्सचा तो तिसरा बळी ठरला. पावसामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने 59 षटकात 6 बाद 149 धावा जमवल्या होत्या. जेनसन 10 तर हार्मेर 6 धावावर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियातर्फे कमिन्सने 3 तर हॅझलवुडने 2 आणि लियॉनने एक गडी बाद केला. शनिवारी पावसामुळे उपाहारापर्यंतचा खेळ होऊ शकला नाही. चहापानावेळी दक्षिण आफ्रिकेची स्थिती 31 षटकात 3 बाद 71 अशी होती. रविवारी पुन्हा पावसाचा अडथळा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प. डाव 4 बाद 475 डाव घोषित (उस्मान ख्वाजा नाबाद 195, स्मिथ 104, लाबुशेन 79, हेड 70, नॉर्त्जे 2-55, रबाडा आणि केशव महाराज प्रत्येकी एक बळी), दक्षिण आफ्रिका प. डाव 59 षटकात 6 बाद 149 (एल्गार 15, इर्वी 18, क्लेसन 2, बहुमा 35, झोंडो 39, वेरेनी 19, जेनसन खेळत आहे 10, हार्मेर खेळत आहे 6, कमिन्स 3-29, हॅझलवुड 2-29, लियॉन 1-65).