वृत्तसंस्था/ लंडन
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या क्वीन्स क्लब ग्रासकोर्ट पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अॅल्कॅरेझ आणि डेन्मार्कचा रूने यांनी एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे.
या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टॉपसिडेड अॅल्कॅरेझने माजी विजेत्या बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. 2014 साली या स्पर्धेत डिमिट्रोव्हने विजेतेपद मिळविले होते. दुसऱ्या एका सामन्यात अमेरिकेच्या सेबेस्टीयन कोर्दाने ब्रिटनच्या कॅमेरून नूरीचा 6-4, 7-6 (7-1) असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली. या स्पर्धेत तब्बल 11 वर्षांनंतर उपांत्यफेरी गाठणारा कोर्दा हा पहिला अमेरिकन टेनिसपटू आहे. डेन्मार्कच्या रूने याने मुसेटीचा 6-4, 7-5 तसेच ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरने मॅनेरिनोचा 6-4, 4-6, 6-4 असा पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले. अॅल्कॅरेझ व कोर्दा तसेच रूने आणि डी मिनॉर यांच्यात उपांत्यफेरीचे सामने होतील.