आप महिला शाखेची मागणी,अन्यथा आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी/पणजी
राज्यात लैंगिक छळाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून एप्रिल आणि मे या दोन महिन्यातच अशा आठ घटनांची नोंद झाली आहे. हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. तरीही भाजप सरकारला यातील गांभीर्य समजून येत नाही, अशी टीका आम आदमी पार्टीच्या महिला शाखाध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केली आहे. सरकारने आतातरी गुन्हेगारी न्याय व्यवस्था मजबूत करावी तसेच महिलांवरील गुन्हे कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी पक्षाच्या नेत्या सिसिल रॉड्रिगीश यांचीही उपस्थिती होती. गेल्या तीन महिन्यांपासून राज्य महिला आयोग आयुक्ताविना कार्यरत आहे, त्यावरूनच महिलांवरील गुह्यांसंबंधी सरकारला गांभीर्य नाही, हे स्पष्ट होत आहे आणि तोच आपल्या टीकेचा पुरावा असल्याचे कुतिन्हो म्हणाल्या.
अन्यथा आप करणार आंदोलन
अशावेळी महिला व बालविकास मंत्री विश्वजित राणे यांनी यांनी महिनाभरात महिला आयुक्तांची नियुक्ती करावी, असे त्या म्हणाल्या. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. सरकारने शाळांमध्ये लैंगिक शिक्षण तसेच अल्पवयीन मुलांसाठी योग्य समुपदेशन वर्ग सुरू करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, आपच्या उपाध्यक्ष सेसिल रॉड्रिगीश यांनी बोलताना महिला आणि अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्यात मंत्री विश्वजित राणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. अनेक खाती सांभाळताना ते एकाही खात्याला धड न्याय देऊ शकत नाहीत, त्यामुळेच महिला व बाल विकास खात्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दावा त्यांनी केला. अशा परिस्थितीत सरकारने या खात्याचा ताबा सांभाळण्यासाठी एखाद्या महिलेकडे मंत्रीपद द्यावे, अशी मागणी रॉड्रिगीश यांनी केली.
भाजपच्या महिला शाखेवरही त्यांनी जोरदार टीका केली. एकेकाळी महिलांच्या विषयांवरून उठसूठ आंदोलने करणाऱया भाजपच्या महिला आता तोंड का उघडत नाहीत? या सर्व पदाधिकारी सध्या कुठे लपून बसल्या आहेत, असे अनेक सवाल रॉड्रिगीश यांनी उपस्थित केले.