उदगाव प्रतिनिधी
शासनाने गाईच्या दुधाला 3.5/8.5 या फॅटला 34 रुपये प्रतिलिटर दर निश्चित केलेला असताना गोकूळ दूध संघाकडून 33 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करत गोकूळकडून शेतकर्यांची लूट थांबवा अशी मागणी करीत आंदोलक अंकुशने उदगांव (ता.शिरोळ) येथे गोकूळच्या सॅटेलाईट सेंटरमध्ये ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आंदोलक उठत नसल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक आपल्या मागणीवर ठाम असल्याने आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाल्याची घटना सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली.
जयसिंगपूर पोलिसांनी आंदोलक अंकुशच्या कार्यकर्त्यांना पोलीस वाहनातून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी आंदोलक अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमूंगे यांनी पोलिसांनी बेकायदेशीररित्या आंदोलन मोडून काढण्यासाठी आम्हांना उचलून पोलीस ठाण्यात आणले आहे. आम्हाला कोर्टात उभे करा अशी मागणी करत कार्यकर्ते दिवसभर पोलीस ठाण्यातच बसून राहिले होते.
सोमवारी सकाळी उदगांव येथे गोकूळच्या सॅटेलाईट सेंटरवर 34 रुपये प्रतिलिटर दूध द्या या मागणीसाठी आंदोलक अंकुशच्यावतीने दूधाची वाहने थांबवून आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
धनाजी चुडमूंगे म्हणाले, 1 ऑक्टोबरपासून गायीच्या दूधाला 4 रुपये दर कपात केली आहे. जिल्हा मध्ये याबाबत आंदोलन सुरू आहेत गेल्या सोमवारी गोकूळचे चेअरमन व एम.डी. यांना भेटून गाईचे दर पूर्वीप्रमाणे करा अशी मागणी केली होती. अन्यथा, सोमवारी उदगांवच्या सॅटेलाईट सेंटरवर आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, याबाबत गोकूळने निर्णय घेतला नसल्याने आम्ही आंदोलन केले. जर शासनाने काढलेले आदेशाचे पालन दूध संघ करीत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी. एकीकडे गोकूळ संघ आम्हाला लुटायला लागले आहे आणि दुसरीकडे पोलीस दडपशाहीने आंदोलन मोडीत काढीत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी धनाजी चुडमूंगे, उदय होगले, भूषण गंगावणे, दीपक पाटील, आप्पासो कदम, दत्ता जगदाळे, बाळू भोगावे, एकनाथ माने, शिरीष वरेकर, राजेंद्र पाटील, अक्षय पाटील, माणिक पाटील यांच्यासह दूध उत्पादक, कार्यकर्ते उपस्थित होते.