टॅक्सीचालकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
तपासणीच्या नावाखाली पोलीस टॅक्सीचालकांना नाहक त्रास देत आहेत. तो थांबवावा. टॅक्सीचालकांना व त्यांच्या कुटुंबीयांना इतर सुविधा द्याक्यात यासह इतर मागण्यांसाठी कर्नाटक राज्य टॅक्सीचालक ट्रेड युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून टॅक्सीचालकांना पोलिसांकडून मोठा त्रास देण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर अवश्य कारवाई करा. मात्र तपासणीच्या नावाखाली त्रास देणे थांबवा. मनमानीपणे दंडाची आकारणी केली जात आहे. एक तर कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला होता. त्यानंतर सध्या काही प्रमाणात व्यवसायाला गती मिळत असली तरी पोलिसांकडून नाहक त्रास केला जात आहे. तो थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
सध्या हा मोर्चा केवळ टॅक्सीचालकांनी काढला आहे. मात्र जर त्रास थांबला नाही तर संपूर्ण कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून आंदोलन करू, असा इशारा देखील देण्यात आला आहे. या व्यवसायावर लाखो लोक पोट भरत आहेत. मात्र अशीच अवस्था राहिल्यास ही सर्व कुटुंबे अडचणीत येणार आहेत. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करा, असे या निवेदनात म्हटले आहे.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य वाणिज्य चालक ट्रेड युनियनचे अध्यक्ष पुनित केरेहळ्ळी, जिल्हा अध्यक्ष भीमसी बजंत्री, राज्य उपाध्यक्ष ईराण्णा नाईक, राजू प्रभाळी, रवी सिद्धगेरीमठ, नागाप्पा नाईक, महेश बजंत्री यासह इतर टॅक्सीचालक उपस्थित होते.