दुर्दैवाने तिन्ही मुलांचा मृत्यू, माता बचावली : जमखंडी तालुक्यातील कुंभारहाळ येथील घटना
वार्ताहर /जमखंडी
तीन मुलांसह मातेने विहिरीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना जमखंडी तालुक्यातील कुंभारहाळ येथे शुक्रवारी सकाळी 10 च्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेत दोन मुली व एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर माता बचावली आहे. आपल्यापोटी आणखी एक मुलगा जन्माला आला नसल्याच्या नैराश्येतून तिने सदर कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सौजन्या (वय 21 दिवस), श्रावणी (वय 3), मुलगा श्रीशैल (वय 5) अशी दुर्दैवी अंत झालेल्या बालकांची नावे आहेत. तर संगीता हनुमंत गुडेप्पागोळ (वय 28, रा. कुंभारहाळ) असे बचावलेल्या मातेचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी बागलकोटचे एसपी जयप्रकाश, जमखंडीचे डीवायएसपी शांतवीर ई., सीपीआय मल्लाप्पा मद्दी, पीएसआय महेश संख यांनी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद जमखंडी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.