1 मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर ‘हजेरी’
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खोटा व्हिडिओ पोस्ट केल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला नोटीस पाठवून 1 मे रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. दिल्ली पोलिसांनी रेड्डी यांना त्यांचा फोन सोबत आणण्यास सांगितले आहे. तेलंगणा काँग्रेसवर शाह यांचा एडिट केलेला आणि बनावट व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पहिली कारवाई झाली असून अमित शाह यांच्याशी संबंधित बनावट व्हिडिओ प्रकरणी आसाम पोलिसांनी रितम सिंह नावाच्या व्यक्तीलाही अटक केली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’ हँडलवर ही माहिती दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आरक्षणाबाबत एक खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. रविवारी याप्रकरणी मोठी कारवाई करत एफआयआर नोंदवण्यात आले. गृहमंत्री अमित शाह यांचा खोटा व्हिडिओ पसरवणाऱ्या लोकांविरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमित शाह यांनी एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण हटवण्याबाबत बोलल्याचा या बनावट व्हिडिओबाबत गैरसमज पसरवला जात होता. प्रत्यक्षात मात्र त्यांनी तसे म्हटले नसल्याचे लाईव्ह भाषणातून स्पष्ट झाले आहे. गृहमंत्री अमित शाह यांचा एक संपादित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर व्हिडिओमध्ये शाह हे आरक्षणाबाबत भूमिका मांडताना दिसत आहेत. अनेक यूट्यूब चॅनलवरही हा व्हिडिओ पोस्ट केला जात आहे. मात्र, बनावट व्हिडिओतील क्लिप जुनी असून ती एडिट करून व्हायरल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.