उमरान मलिकचे शेवटच्या षटकात 3 बळी, भुवनेश्वरचा भेदक मारा, लिव्हिंगस्टोनचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
युवा गोलंदाज व सामनावीर उमरान मलिकने टाकलेले शेवटचे सनसनाटी षटक, भुवनेश्वर कुमारचा भेदक मारा आणि मॅरक्रम, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन यांच्या समयोचित फलंदाजीमुळे सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमधील साखळी सामन्यात पंजाब किंग्सवर 7 गडय़ांनी दणदणीत मात करीत चौथा विजय मिळविला. गुणतक्त्यातही त्यांनी पहिल्या चारमध्ये स्थान मिळविले आहे.
हैदराबादकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर पंजाब किंग्सची खराब सुरुवात झाली असली तरी लियाम लिव्हिंगस्टोनने प्रतिआक्रमण करीत 33 चेंडूत 60 धावा फटकावल्याने पंजाब किंग्सला निर्धारित 20 षटकांत सर्व बाद 151 धावा जमविता आल्या. उमरान मलिकने शेवटच्या षटकात तीन बळी मिळवित सनसनाटी निर्माण केली. पंजाबने केवळ 7 चेंडूत 5 बळी गमविल्याने त्यांना मोठी मजल मारता आली नाही. उमरान मलिकने 28 धावांत 4 बळी टिपले. विशेष म्हणजे शेवटचे षटक निर्धाव टाकण्याचा दुर्मीळ पराक्रम त्याने केला. भुवनेश्वर कुमारने लिव्हिंगस्टोनचा अडथळा दूर केल्यानंतर 22 वर्षीय मलिकने अखेरच्या षटकात 3 बळी मिळविले तर एक फलंदाज शेवटच्या चेंडूवर धावचीत झाल्याने पंजाबचा डाव संपुष्टात आला. त्यानंतर हैदराबादने 18.5 षटकांत 3 बाद 152 धावा जमवित चौथा विजय साकार केला.
माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवातही खराब झाली होती. कर्णधार केन विल्यम्सन 3 धावांवर बाद झाला. सलामीवीर अभिषेक शर्मा (25 चेंडूत 31) व फॉर्ममध्ये असलेला राहुल त्रिपाठी (22 चेंडूत 34) यांनी चांगली सुरुवात केली. पण त्यांना त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करता आले नाही. पण माफक आव्हान असल्याने त्यांना फारशी काळजी करावी लागली नाही. विंडीजचा निकोलस पूरन (30 चेंडूत नाबाद 35) व एडन मॅरक्रम (27 चेंडूत नाबाद 41) यांनी चौथ्या गडय़ासाठी 50 चेंडूत अभेद्य 75 धावांची भागीदारी करून विजयाचे सोपस्कार 19 व्या षटकात पूर्ण केले.
सराव करताना अंगठय़ाला दुखापत झाल्याने पंजाबचा नियमित कर्णधार मयांक अगरवाल या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागी शिखर धवनने संघाचे नेतृत्व केले. पंजाबचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले नाही. त्यांनी काही धावचीतच्या संधी दवडल्या तर छोटय़ा धावसंख्येचे संरक्षण करताना अनेक सोप्या धावा दिल्या. मॅरक्रमने 19 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अरोराला षटकार ठोकून सामना संपवला. या विजयाने हैदराबादचे 8 गुण झाले असून ते आता चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत तर पंजाब 6 गुणांसह सातव्या स्थानावर स्थिर राहिले आहे.
लिव्हिंगस्टोनचे अर्धशतक
तत्पूर्वी, या मोसमातील सर्वात महागडा (रु. 11.50 कोटी) विदेशी खेळाडू असलेल्या लिव्हिंगस्टोनने पंजाबचा डाव सावरताना आक्रमक 60 धावांची खेळी केली. चार सामन्यातील त्याचे हे तिसरे अर्धशतक आहे. आठ षटकांत 4 बाद 61 अशा स्थितीनंतर लिव्हिंगस्टोनला शाहरुख खानकडून (28 चेंडूत 26 धावा) चांगली साथ मिळाली. या जोडीने 49 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली. संथ खेळपट्टीवर सुरुवातीला धावा जमविणे कठीण जात होते. पण लिव्हिंगस्टोनने अशा खेळपट्टीवरही सर्व बाजूने फटकेबाजी केली. त्याला भुवनेश्वरने बाद केल्यानंतर मात्र सामना हैदराबादच्या बाजूने फिरला. पंजाबने यानंतर सात चेंडूत पाच बळी गमविल्याने 6 बाद 151 वरून सर्व बाद 151 असा त्यांचा डाव गडगडला. मलिकने शेवटचे शानदार षटक टाकत पंजाबला दीडशे धावांवरच रोखता आले. मलिकने स्लोअरवनवर ओडीयन स्मिथला बाद केल्यानंतर राहुल चहर व वैभव अरोरा यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. पंजाबने प्रारंभी पाच षटकाच्या आतच 2 बळी गमविले, त्यात हंगामी कर्णधार शिखर धवनचा (8) समावेश होता. नंतर बेअरस्टो (12) व जितेश शर्मा (11) हेदेखील लवकर बाद झाले.
संक्षिप्त धावफलक ः पंजाब किंग्स 20 सर्व बाद 151 ः धवन 8 (11 चेंडूत 1 चौकार), प्रभसिमरन सिंग 14 (11 चेंडूत 2 चौकार), बेअरस्टो 12 (10 चेंडूत 2 चौकार), लिव्हिंगस्टोन 60 (33 चेंडूत 5 चौकार, 4 षटकार), जितेश शर्मा 11 (8 चेंडूत 2 चौकार), शाहरुख खान 26 (28 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), स्मिथ 13 (15 चेंडूत 1 षटकार), रबाडा नाबाद 0, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग 0, अवांतर 7. गोलंदाजी ः उमरान मलिक 4-28, भुवनेश्वर 3-22, टी.नटराजन 1-38, जे. सुचित 1-28.
सनरायजर्स हैदराबाद 18.5 षटकांत 3 बाद 152 ः अभिषेक शर्मा 31 (25 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), विल्यम्सन 3, त्रिपाठी 34 (22 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), मॅरक्रम नाबाद 41 (27 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), पूरन नाबाद 35 (30 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 8. गोलंदाजी ः राहुल चहर 2-28, रबाडा 1-32, वैभव अरोरा 0-35, अर्शदीप सिंग 0-28, लिव्हिंगस्टोन 0-19 (2 षटके).