वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज 32 वर्षीय सूर्यकुमार यादवने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत 3000 धावांचा टप्पा ओलांडला. 2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील येथील वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने केवळ 35 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारासह जलद 83 धावा नोंदवत आपल्या संघाला सहा गड्यांनी विजय मिळवून दिला होता.
सूर्यकुमार यादवने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत 30.82 धावांच्या सरासरीने तसेच 141.45 स्ट्राईक रेटने 3020 धावा जमवल्या असून त्यामध्ये 20 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधील 83 ही त्याची सर्वेच्च धावसंख्या आहे. 2018 चा आयपीएल हंगाम सूर्यकुमारला सर्वात यशस्वी ठरला होता. त्याने त्या हंगामात 14 सामन्यात 36.57 धावांच्या सरासरीने 512 धावा जमवल्या होत्या. त्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता. 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सुरुवातीच्या काही सामन्यामध्ये सूर्यकुमार सूर मिळवण्यासाठी झगडत होता. पण त्याने यावेळी 11 सामन्यातून 34.18 धावांच्या सरासरीने 376 धावा जमवल्या असून त्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. चालू आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा जमवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार आठव्या स्थानावर आहे. सोमवारच्या सामन्यातील विजयामुळे मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 12 गुणासह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर बेंगळूरला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.