आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेचा निर्णय, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये व्यक्तीगत भाग घ्यावा लागणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक निर्धारित कालावधीत न झाल्याने आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेने कारवाईचा दणका दिला आहे. भारतीय कुस्ती संघटनेची मान्यता निलंबित करण्यात आली आहे. परिणामी, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वैयक्तिक भाग घ्यावा लागणार आहे. ही निवडणूक 12 ऑगस्टला होणार होती. तथापि, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने या निवडणुकीला 28 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली. परिणामी, आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेने ही कारवाई केली. गेले एक वर्षभर कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यासंबंधी मोठीच वादग्रस्तता निर्माण झाल्याने संघटनेचे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे निवडणुका वेळेवर घेणे शक्य झाले नाही. परिणामी, नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
गंभीर परिणाम होणार
भारतीय कुस्तीपटूंवर या कारवाईचा परिणाम होणार आहे. जोपर्यंत निलंबन आहे तोपर्यंत त्यांना देशाचे प्रतिनिधी म्हणून कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेता येणार नाही. त्यांना वैयक्तिक भाग घ्यावा लागेल. त्यांना देशाचे नाव, ध्वज आणि राष्ट्रगीत यांचा उपयोग करता येणार नाही. त्यांनी पदक जिंकल्यास भारताचा राष्ट्रध्वज न उंचावता असेच राष्ट्रगीताची धून न वाजताच त्यांना पदक स्वीकारावे लागणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
खेळाडू स्पर्धेत भाग घेणारच
कुस्तीची विश्वच्ँापियनशिप स्पर्धा लवकरच सुरु होत आहे. या स्पर्धेच्या सर्व 10 श्रेणींमध्ये भारतीय खेळाडू भाग घेणार आहेत. ते 25-26 ऑगस्टला स्पर्धेसाठी जाणार आहेत. जागतिक कुस्ती संघटनेच्या निर्णयामुळे त्यांच्या कार्यक्रमात कोणतेही परिवर्तन होणार नाही. ते पूर्व निर्धारित कार्यक्रमानुसार स्पर्धेत भाग घेण्यासाठी जातीलच, असे कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मान्यता पुन्हा मिळू शकते
भारतीय कुस्ती संघटनेची मान्यता निलंबित केली असली तरी ती पुन्हा मिळू शकते. त्यासाठी ठराविक कालावधीत अटींची पूर्तता करावी लागणार आहे. तसे झाल्यास सध्याची स्थिती दूर होऊ शकते, असे अनेक क्रीडातज्ञांचे मत आहे. भारताने यापुढे या संबंधात दक्षता घ्यावी अशीही सूचना त्यांनी केली आहे.