नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्हय़ातील मेंढर येथे भारतीय सेनेच्या वाहनांवर स्फोटके टाकून जो हल्ला करण्यात आला होता, त्या हल्ल्यातील शस्त्रे पोहचविण्यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यात आला होता, असे तपासात उघड झाले आहे. ही माहिती जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली. ही शस्त्रे पोहचविण्यात स्थानिकांनीही साहाय्य केल्याचे दिसून आले आहे. यांपैकी एकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी होत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पूंछ भागात 12 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. भारतात घुसल्यानंतर त्यांनी विविध गटांमध्ये स्वतःला विभागून घेतले आहे. याच दहशतवाद्यांनी पूंछ हल्ला घडवून आणला आहे. त्यांना शस्त्रपुरवठा ड्रोनमधून करण्यात आला. ड्रोनमधून काही स्फोटके टाकण्यात आली. ती स्थानिकांनी या दहशतवाद्यांपर्यंत पोहचविली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ड्रोनमधून नेमकी कोठे शस्त्रे टाकण्यात आली, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी निसार अहमद नामक स्थानिकाला अटक करण्यात आली आहे. त्याने चौकशीत बरीच गुप्त माहिती दिली असून या माहितीची पडताळणी केली जात आहे. याच माहितीच्या आधारावर पुढील तपास सुरु असून लवकरच सूत्रधारांपर्यंत पोहचणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन सिंग यांनी केले.
या हल्ल्यात 5 सैनिक हुतात्मा झाले होते. हा हल्ला अत्यंत अचूकपणे करण्यात आला होता. त्यामुळे जास्त हानी करण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश साध्य झाला. आतापर्यंत पोलिसांनी हा संपूर्ण प्रदेश पिंजून काढला असून 200 स्थानिकांची चौकशी केली आहे. 12 संशयितांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. प्रथम एका हल्लेखोराने सैनिकांच्या वाहनाच्या चालकाला गोळी घालून ठार केले. त्यानंतर सैनिकांवर गोळीबार केला. मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांची शस्त्रे त्यांनी हिसकावून घेतली, असेही तपासात उघड झाले आहे. दहशतवाद्यांनी पोलादी गोळय़ा वापरल्याचेही दिसून आले आहे. या गोळय़ा आधिक आत घुसून जास्त हानी करतात, अशींही माहिती दिलबाग सिंग यांनी दिली.