मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी
बेळगाव : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व सीमाभागाचे आधारस्तंभ शरद पवार यांना काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या थोर पंरपरेला काळीमा फासणारा हा प्रकार आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांच्यावतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. सीमाप्रश्नाच्या प्रत्येक आंदोलनात शरद पवार यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. याचबरोबर सीमाप्रश्नाला बळ देण्याचे काम त्यांनी आजवर केले आहे. मराठी भाषिकांवर अन्याय झाला की पहिली हाक ही शरद पवार देतात. त्यामुळे सीमावासीय आपला एक आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहतात. परंतु त्यांना धमकी देण्याचे प्रकरण गंभीर असून महाराष्ट्र सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केली आहे.