डॉ. संजय सावंत देसाई यांचे उद्गार
प्रतिनिधी /कुंकळळी
विद्यार्थ्यांसाठी शिक्षक व पालकांनी पोषक वातावरण तयार करण्यावर भर द्यावा, असे आवाहन कुंकळ्ळी येथील सीईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सावंत देसाई यांनी केले. पालक व शिक्षकांना त्यांच्या जबाबदाऱयांबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कसे पोषक वातावरण तयार केले जाऊ शकते याबाबत मार्गदर्शन केले.
सीईएस महाविद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी पालक-शिक्षक संघाची समिती या वेळी निवडण्यात आली. या पदाधिकाऱयांत क्रिस्टीन रेगो, फेलिक्स फर्नांडिस, लिओन कुतिन्हो, शांताराम देसाई, मेलबोन डिकॉस्ता, राधिका देसाई, भारती पच्चीपाला, विजय मोपकर, मानसी प्रभुदेसाई या पालकांचा समावेश आहे.
साहायक प्राध्यापक ब्रिजेश्वर देसाई यांनी या महाविद्यालयातील साधन सुविधांबाबत केलेले दृकचित्रीकरण या वेळी प्रदर्शित करून त्याबाबत पालकांना विस्तृत माहिती करून देण्यात आली. त्याचबरोबर पालकांचेही स्नेहबंध शिक्षकांशी निर्माण व्हावेत या हेतूने सर्व शिक्षकांनी स्वतःची ओळख पालकांना करून देण्यात आली.
पालक-शिक्षक संघाचे समन्वयक असलेले सहयोगी प्राध्यापक आनंद देसाई या प्रसंगी म्हणाले, पालकांनी व शिक्षकांनी मिळून कार्य केले तरच विद्यार्थीरूपी रोपटे मुळापासून बळकट बनून आकाशाला गवसणी घालेल व त्यांचा सर्वांगीण विकास होईल. या प्रसंगी पालकांनीही स्वतःच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सूत्रसंचालन साहायक प्राध्यापक यशमिता घाटवळ यांनी केले.