वृत्तसंस्था /हैदराबाद
तेलंगणात पेपर लीक (प्रश्नपत्रिका फुटणे) प्रकरणी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना बॅकफूटवर जावे लागले आहे. पेपर लीकप्रकरणी केसीआर अन् त्यांचे पुत्र टी. रामाराव तसेच कन्या के. कविता यांच्यावर विरोधी पक्षांनी आरोप केले आहेत. पेपर लीक प्रकरणात राज्याचे मंत्री तारक रामाराव अन् त्यांचे निकटवर्तीय सामील असल्याचा आरोप भाजप तसेच काँग्रेसकडून करण्यात आला आहे. माध्यमिक बोर्डाच्या हिंदी अन् तेलगू विषयाच्या 4 एप्रिल रोजीच्या परीक्षेत 4.90 लाख विद्यार्थी सामील झाले होते. प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पेपर लीकप्रकरणी राज्यातील सत्तारुढ भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) भाजप तसेच काँग्रेसकडून टीकेचा भडिमार सहन करावा लागत आहे. परंतु बीआरएस केवळ भाजपलाच स्वतःचा राजकीय शत्रू मानत आहे. पेपर लीकप्रकरणात स्वतःचे नाव घेतले गेल्याने तारक रामाराव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष संजय कुमार यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा केला आहे.