हस्तकला महामंडळाने मागविल्या ऑनलाइन बोली, साळावली येथे साकारणार प्रकल्प, 20 कोटी होणार खर्च
सांगे : सांगे तालुक्यातील उगे, साळावली येथे कुणबी हस्तकला ग्राम विकसित करण्यासाठी गोवा हस्तकला, ग्रामीण आणि लघुउद्योग विकास महामंडळाने गोवा राज्यातील सार्वजनिक बांधकाम खाते (इमारत विभाग) वा जलस्रोत खात्याकडे योग्य श्रेणीत नोंदणीकृत असलेल्या मान्यताप्राप्त आणि पात्र कंत्राटदारांकडून ऑनलाईन बोली मागविणारी निविदा जारी केली आहे. सांगेचे आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प पुढे येत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून साळावली येथे कुणबी हस्तकला ग्रामची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. आत्ता त्याची निविदा जारी झाल्याने फळदेसाई यांनी आनंद व्यक्त केला आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 पर्यंत आहे. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वा. ऑनलाईन तांत्रिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. आर्थिक निविदा खुल्या करण्याची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, सदर ग्राम निर्माण करण्यासाठी यापूर्वीच जलस्रोत खात्याकडून 16000 चौरस मीटर जमीन गोवा हस्तकला, कापड आणि काथ्याकाम खात्याला हस्तांतरित करण्यात आली असून केंद्र सरकारने दक्षिण गोव्यातील हे कुणबी हस्तकला ग्राम बांधण्यास मंजुरी दिलेली आहे. केंद्रीय वस्त्राsद्योगमंत्री पियूष गोयल यांनी ऑनलाइन केलेल्या घोषणेमध्ये ते यापूर्वीच सांगितलेले आहे. वस्त्राsद्योग मंत्रालयाने कुणबी हस्तकला ग्रामला मान्यता दिल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील कारागीर आणि वीणकरांना मोठे वरदान लाभले आहे, असे फळदेसाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
सदर ग्राम सांगे तालुक्यातील साळावली धरणाजवळ येत असून हे धरण आणि त्याच्या पायथ्याशी असलेले बोटॅनिकल गार्डन म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी आहे. या गार्डनमध्ये ‘पीपीपी’ तत्त्वावर योग, निसर्गोपचार आणि वेलनेस केंद्राची गोवा वन विकास महामंडळामार्फत उभारणी होणार आहे. हस्तकला ग्रामसाठी केंद्रीय वस्त्राsद्योग मंत्रालयाकडून आर्थिक अनुदान व इतर आवश्यक साहाय्य दिले जाईल. हस्तकला ग्राम स्थापन करण्यामागचे एक उद्दिष्ट पर्यटकांसाठी अतिरिक्त आकर्षण निर्माण करणे हा आहे. तसेच सुप्रसिद्ध हातमाग आणि हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देणे हाही एक उद्देश आहे, ज्यामुळे वीणकरांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. गोव्यात हातमाग, वीणकाम ही जवळजवळ एक लुप्त होत चाललेली हस्तकला आहे. कुणबी वीणकामाचे पुनऊज्जीवन करण्यासाठी फॅशन डिझाईनर वेंडेल रॉड्रिग्स यांच्यासह अनेकांनी अलीकडे प्रयत्न केलेले आहेत. हस्तकला ग्रामातून या क्षेत्राला नवीन कल्पना देणे आणि शक्य असेल तेथे तांत्रिक प्रगतीचा परिचय करून देणे अपेक्षित आहे.
सांगेच्या विकासाला बळकटी मिळेल : फळदेसाई
सांगे तालुक्याच्या विकासाला हस्तकला ग्राममुळे बळकटी मिळेल. सुमारे 20 कोटी रु. गुंतवणुकीचा हा प्रकल्प असून येथे कुणबी हस्तकलेला प्रोत्साहन दिले जाणार आहे. येथे कुणबी साडी आणि शालीचे वीणकाम करून त्यांची विक्री केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटनदृष्ट्या आकर्षण निर्माण होईल, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले. कुणबी हस्तकला उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होईल. याद्वारे येथील महिलांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे ते म्हणाले.